सांगली – ज्योती मोरे
१२ जानेवारी २०२३ ला नवी दिल्ली येथे माननीय केंद्रीय कृषीमंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते सन्मानित करणेत येणार आहे. कृष्णा व्हॅली आडवांसड ॲग्रीकल्चर फाउंडेशन ही संस्था पी-६१ कुपवाड एमआयडीसी येथे स्थित असून २००२ पासून मॅनेज हैदराबादद्वारे केंद्रीय कृषी मंत्रालय (भारत सरकार) मार्फत सुरू केलेल्या ए. सी. ए. बी. सी. प्रशिक्षण कृषी पदवी आणि पदविकाधारकांना देण्यात येते.
प्रशिक्षण देण्याची पद्धती, समाविष्ट केलेले शेती आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम आणि या विषयी प्रशिक्षण देणारे ऊच्चशिक्षित आणि अनुभवी प्रशिक्षक आणि सर्व प्रकारचे व्यवस्थापनामुळे या संस्थेमध्ये प्रशिक्षणाची मागणी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामधून वाढू लागल्याने सांगली व्यतिरिक्त उत्तूर (कोल्हापूर), सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, बुलढाणा आणि नागपूर येथे या संस्थेने शाखा चालू केलेली आहे . या सर्व ठिकाणी राहण्याची ,जेवणाची आणि प्रशिक्षणाची परिपूर्ण व्यवस्था केलेली आहे.
त्या त्या ठिकाणी असणारे नामांकित कृषी आणि व्यवस्थापन महाविद्यालय मधून जाणकार प्राध्यापकांना प्रशिक्षणाकरिता नियुक्त केलेले आहे. हे सर्व सांभाळण्यासाठी एक नोडल ऑफिसर आणि त्यासोबत ४ – ५ संबंधितांची नियुक्ती केलेली आहे . मॅनेज हैदराबादच्या निर्देशाप्रमाणे चालणारे ४५ दिवसांचे पूर्णतः मोफत निवासी प्रशिक्षण केंद्रशासन तसेच नाबार्ड यांच्या मान्यतेने दिले जाते. कृषी उद्योजक तयार करणे तसेच कृषिपूरक उद्योगांना प्रोस्थाहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या सर्व शाखा मार्फत आजतागायत सुमारे ८६०० युवकांना प्रशिक्षण दिलेले असून त्या मध्ये सुमारे ६५०० युवकांनी आपापला कृषी उद्योग सुरु केलेले आहेत. हे आकडे देशाचे सर्व प्रशिक्षण संस्था मधील उच्चांकी आहेत . हे युवक त्यांच्या उद्योगामाफत करोडो रुपयाची गुंतवणूक करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना लागणाऱ्या कृषी निविष्ठा तसेच कृषिपूरक उद्योगांची माहिती उपलब्ध करून देतात.
२० वर्षाचे अथक परिश्रम, त्यामुळे झालेले प्रशिक्षणार्थी आणि उद्योग प्रस्थापित केलेले बहुसंख्य युवक आणि त्यांच्या कार्यामुळे झालेले कृषी विस्तार व त्याची उपयुक्तता बघून कृषी मंत्रालय भारत सरकार तसेच मॅनेज हैदराबाद यांच्यामार्फत कृष्णा व्हॅली आडवांस एग्रीकल्चर फाउंडेशनला संपूर्ण भारतामधून सन २०२२ सालाचा सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण केंद्र हा पुरस्कार देऊन गौरव करणेत येणार आहे.
हा मानाचा पुरस्कार एग्री क्लिनिक अँड ऍग्री बिजनेस योजनेअंतर्गत असून हा पुरस्कार १२ जानेवारी २०२३ रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे.
सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असून यासाठी कृष्णा व्हॅली आडवांस एग्रीकल्चर फाउंडेशनचे फाउंडर चेअरमन व मार्गदर्शक मा प्रवीणजी लुंकड, चेअरमन मा. एन जी कामत आणि मा. अब्दुलवहाब देवर्षी नोडल ऑफिसर व शरद कांबळे समन्वयक तसेच त्यांचे सहकारी सर्व टीम यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्वयंरोजगारीता या तत्वाचा अवलंब करून नोकरी घेणार्यापेक्षा नोकरी देणारे बनुया आणि कृषी व्यवसायामध्ये आपले भवितव्य घडवण्यासाठी सर्व कृषी पदवी आणि पदविका धारकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा आणि सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी ०२३३-६६३६६०३ या क्रमांकावरती संपर्क करावे असे चेअरमन श्री. एन. जी. कामत यांनी आवाहन केले आहे .