कोल्हापूर – राजेंद्र ढाले
केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअरच्यावतीने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आज ऑनलाईन फ्लॅग दाखवून विमानसेवेला सुरुवात करण्यात आली.
आठवड्यातील तीन दिवस ही विमानसेवा कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध असणार आहे. या विमातळामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी तसेच इतर बाबींना चालना मिळून कोल्हापूरचा विकास होण्यास मदत होईल. या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे व्हावीत यासाठी आपले मंत्रालय कार्य करेल, तर कोल्हापूर येथील हे विमानतळ देशातील एक महत्वाचे विमानतळ म्हणून नावारुपाला येईल असा आशावाद मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, छत्रपती शाहू महाराज, राज्यसभा खासदार धनंजय महाडीक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ,
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, स्टार एअरचे चेअरमन संजय घोडावत, संचालक श्रेणिक घोडावत आदी उपस्थित होते.