Wednesday, November 13, 2024
Homeराज्यशिक्षकांना दिशा देण्याकरिता 'कोहळा' शाळा प्रेरणादायी - गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के...

शिक्षकांना दिशा देण्याकरिता ‘कोहळा’ शाळा प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के…

कोहळा शाळेत गुणवत्तापूर्वक शिक्षण

शिक्षक दामोधर कुटे व शिक्षक गजानन गणोरकर यांचे विशेष प्रयत्न

नरखेड – अतुल दंढारे

जि.प.प्राथमिक शाळा, कोहळा येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाख्यानाजोगी आहे.विविध शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूलभूत संबोध स्पष्ट झालेले असून वाचन,लेखन व गणितीय प्रक्रिया विद्यार्थी सुलभपणे करतात.म्हणून शिक्षकांना ‘दिशा’ देण्याकरिता ‘कोहळा’ शाळा प्रेरणादायी असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांनी व्यक्त केले.

शासनाच्या दिशा उपक्रमाला काटोल तालुक्यात प्रभावी करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के व शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर यांच्या संकल्पनेतून शिक्षकाकरिता ‘प्रेरणादायी शाळाभेट’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.या उपक्रमांतर्गत काटोल तालुक्यातील १३ केंद्रातील १३ केंद्रप्रमुख व ४५ शाळेतील ८४ शिक्षकांनी कोहळा शाळेला भेट देऊन गुणवत्तेचे सहस्य शाळेचे मुख्याध्यापक दामोधर कुटे व शिक्षक गजानन गणोरकर यांच्याकडून जाणून घेतले.

कॉन्व्हेंट मधील विद्यार्थ्यांना लाजवेल असे इंग्रजी वाचन, मराठी वाचन , श्रुतलेखन तसेच सर्वच संख्याज्ञान , गणितीय क्रिया बघून शिक्षकांना व पर्यवेक्षीय यंत्रणेला आश्चर्य वाटले.शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्व मूलभूत संबोध स्पष्ट झाल्याचे मुख्याध्यापक दामोधर कुटे यांनी सांगितले. यावेळी उपक्रमशील शिक्षक वैशाली बोरकर, योगेश चरडे व प्रभा वानखेडे यांनी विद्यार्थी गुणवत्तेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजू धवड, संचालन केंद्रप्रमुख पांडुरंग भिंगारे तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन गणोरकर यांनी केले.यावेळी गटसमन्वयक नरेश भोयर व गट साधन केंद्र येथील साधनव्यक्ती रमा धवड, मनीषा बुचे, प्रशांत डांगे,प्रशांत लांबट उपस्थित होते. कोहळा शाळेत पुढील वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिलीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे.त्यांना मुळाक्षरे, अल्फाबेट्स व गणन प्रक्रिया पूर्ण करता येते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: