वर्धा जिल्ह्यातील आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम १९४२ च्या लढ्यात भोई समाजाचा सहभाग , बंडखोर खेड्याची गोष्ट. आष्टी गावात भोईपुऱ्यातील तो झोपडी ! हे त्या उकंड्या भोयाची झोपडी. दहा बाय दहात माजघर अन पडवी विभागलेली होती. कौलारु छप्पर वाकलंय आणित्या वाकलेल्या छप्पराखाली तशीच वाकलेली जख्ख म्हातारी (आई) उभी होती.
तिच्या मांडीवरचं पातळ वारंवार शिवुन उसवलंय आणि म्हातारीची लाज झाकण्याचा प्रयत्न अखेर त्यानं सोडुन दिला होता.कदाचित शतकानुशतके हा प्रकार चाललेला होता. ही म्हातारी काही उघड्या भोयाची माय नव्हे. पण त्याच्या मायंच पातळही मांडीवर असंच चिध्या झालेलं नक्किच असावं. त्याच्या फ़ाशीच अपील प्रीव्ही कोर्टापर्यंत गेलं होत.
केसच्या माथ्यावर लिहिल होत- उकंड्या विरुद्ध बादशहा ! आणि उकंड्या कुठल्यातरी परगावच्या सरकारी कचेरीत चपराशी होता. देशभक्तीच फ़ळ त्याला मिळाल होतं. पण खांबाला टेकुन टाहो फ़ोडणाऱ्या मायेचं न ऎकता उकंड्या “भारत माता की जय” म्हणत पिसाटासारखा बाहेर पडुन जमावात मिसळला होता. तो गोविंद मालपे तर उपाशीच उठुन गेला होता.
तेव्हा या फ़ळाची अपेक्षा कोणास होती ! जपण्यासारखं त्याच्याजवळ काय होतं? कदाचित काहीही नव्हतं. म्हणूनच ही गावची पोर बारुंदीप्रमाणे पेटुन उठलो आणि एक उभंच्या उभं सरकार(पोलीस स्टेशन) त्यांनी पेटवून दिलं. हे अस गाव बारुदीसारख! हे असे राव गुलामशहा. उकंड्या भोई! त्याच्या बापाचा, बापाच्या बापाचा आणि त्याच्याही बापाचा जन्म कधी मोलमजुरीत,कधी फ़ुटाने विकण्यात तर कधी मासे धरण्यात गेला होता.
उकंड्या तेच करायचा. पोटाला पुरतं न मिळुनही त्यानं शरीर रग्गड कमावल होतं. आणि दुसराही एक छंद त्याला लागला होता, गावात कुठलीही फ़ेरी निघाली की त्यात सामील व्हायचं ! मग तो गोरक्षण मंडळाची असो, की आरती मंडळाची की क्कॉंग्रेसची ! पुस्तकातली व भाषणातली देशभक्ती त्याला फ़ारशी कळत नसे., पण अगदी लहानपणापासुन दहा माणसं एकत्र दिसले की त्याचे हातपाय फ़ुरफ़ुरु लागत आणि न बोलावताच तो मेळाव्यात सामील व्हायचा ! त्याला फ़ार फ़ार गंमत वाटायची त्यात.
असा हा उकंड्या त्या दिवशीही फ़ेरीत असा गंमतीनच सामील झाला. जमावाला जेव्हा बदल्याची नशा चढली तेव्हा आपल्या हातात उभारी केव्हा आली हे त्याला समजलच नाही. एखाद्या माणूसखाया वाघाची हाका करुन शिकार करावी तसं त्या भोकन्या संमदला त्यानं रानातुन धुंडाळुन काढलं होतं अन एकाच दणक्यात कै. इन्स्पेक्टर रामनाथ मिश्रा (गुलामीचा पळपट्टा) व कै. जमादार लालासिंग (पत्थरबॉम्बचे बळी)कपाळमोक्ष केला होता.
फ़ाशीच्या खोलीतही त्याला फ़ार मजा वाटायची फ़ाशीचा दिवस जवळ यायचा तसा आनंद शरीरात दाटू लागे. कारण मात्र कळेना ! सन १९४२ साली गाव या गुलामशाही विरुध्द भडकल, तो काही पहीला प्रकार नव्हता. दोन तीन पिढ्या अगोदरपासुन या बारुदील बत्ती लागत होती.
जुलूमशाहीच्या विरुध्द आवज काढला म्हणुन गावचं पहिल पोरं,जेल मध्ये गेल ते थेट १९०८ साली बळवंत जागेश्वर घाटे त्याच नाव! आता ज्यांच्या डोक्यावर फ़ासाची दोरी अजुन लटकत होती असे आष्टीचे दोन जण फ़क्त उरले एक,डॉ. तुळशीराम पांचघरे आणि दुसरा उकंड्या भोई!
आई भेटायला आली.
“ बाबू उकिंड्या, मले अथी सोडुन जातं का रे ?”
आणि ऊर फ़ाटल्यासारखी रडत सुटली.
पण त्याचा आनंद ढळेना! म्हणाला,
“ अवो माय,मी तं अमर झालो. तु काहुन रडतं?”
पण तो दिवस येत होता आणि त्याला जिताच ठेऊन जात होता. कोण कुठ काय करीत होतं,कुणास ठाऊक! पण त्याची फ़ाशी वारंवार टळत होती हे खरं.
दि. १७ ऑगष्ट १९४५.
पहाटेच्या नि:स्तब्ध,गडद शांततेत तो आवाज घुमायचा. फाशीचा तख्ता खाली कोसळल्याचा आवाज,आणि फ़ांसात अडकुन लोंबणाऱ्या निर्जीव बंद्याचं चित्र उकंडरावापुढ उभ राहायचं. गेली चार वर्ष हे आवाज फ़ाशीच्या खोलीतुन तो ऎकत होता. नाही तरी तीन एकशे लोक त्याच्यासमोर असे फ़ासावर लटकले असतील.एखाद्या दिवशी तर दोन दोन !
उद्या आपल्या पायाखालुन देखील ते तख्त निखळून पडेल आणि फ़ाशी घराबाहेर पावलं वाजली. उकंड्याला वाटलं, “आले यमदुत !”
पण त्या एवजी दुसरच बोलावण आलं. मोठ्या जेलच्या प्रांगणात त्याला आणण्यात आलं. तिथ अँड .घाट्यांची ठेंगणी ठुसकी हसतमुख मुर्ती उभी होती. त्यांच्याबरोबर ….एड . मनोहर व उधोजी हेही होते.
‘मी आलो ना, उकंडराव !‘ घाटे म्हणाले.
ते फ़ार जपुन बोलत होते. त्या आनंददायक बातमीचा धक्का असह्य ठरु नये म्हणुन हळू-हळू त्यांच मन तयार करीत होते.
‘मी म्हटलं होतं ना! वेळ येईल तेव्हा तुम्हा साऱ्यांना भेटायला येईन!‘ उकंड्याच्या डोळ्यात अश्रू उभे होते. त्याला वाटत होतं, ‘ही अखेरची भेट. बिचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले आपला जीव वाचवण्यासाठी!‘
मग घाटे साहेबांनी आणखी काही इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. आणि मग त्यांचा पहिला भर ओसरु दिल्यावर म्हटलं,‘आता तुम्ही पेढे चारता की मी चारु !‘
‘काहुन बा‘
‘ अरे गड्या, तुझी फ़ाशी झाली रद्द! कायमची !
‘ खरं! आणि त्याला आवरलं नाही. तसाच तो झेपावला आणि घाट्यांच्या पायाशी तो लोळण घेणार तोच घाट्यांनी त्याला उचलुन धरला.
पापण्याची कपारी भेदीत आनंदाचे लोट वाहू लागले. आन मग त्याला वाटलं एकदम हनुमंतासारखा बुभुक्कार ठोकून उडान घ्यावं ! त्याच वेळी उकंड्याच्या मायभुमीला अजुन उकंड्या हवा होता !
आष्टी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भोई समाजातील भाग घेणाऱ्यांमध्ये दि. ५ डिसेंबर १९४२ ला विशेष न्यायालया तर्फ़े शिक्षा सुनावण्यात आलेले आरोपी
फ़ाशीच्या शिक्षेमध्ये उकंड्या आनंदराव भोई, जन्मठेपमध्ये चंपत ह.भोई (सतपाळ), राजाराम शिवा भोई, केंद्र सरकार तर्फ़े फाशी रद्द १८ ऑगष्ट १९४५ उकंड्या आनंदराव भोई(सोनोने). सेशन्स कोर्ट वर्धा येथे चाललेल्या खटल्याचा निकाल २१/१०/१९४४, जन्मठेप गनपत किसन भोई, जेल भोगणारे सकाराम लाड व इत्यादी,
या महान स्वातंत्र्यविर संग्राम सैनिकांना क्रांतिकारी सलाम
पुस्तकाचे नाव – बंडखोर खेड्याची गोष्ट
लेखक – रमेश गुप्तां
प्रकाशक – रामकृष्ण गंजीवाले, आष्टी
दि. १५/०६/१९७६ रोजी प्रकाशित
माहिती संकलन – वासुदेव बा. सुरजूसे.
मु.पो.राजुरा बाजार . ता.वरूड जि.अमरावती
मो. ९८२२७४४७७१
स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रसिद्ध