जतचे ग्रामस्थ कर्नाटकाच्या कारस्थानाला बळी पडणार नाही…
सांगली – ज्योती मोरे
सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.
जत तालुक्यातील ६५ गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे पाणी तिथे जात नव्हते. या गावांना पाणी मिळावे यासाठी येथील नागरिक अनेक वर्षांपासून मागणी करत होते. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर जलसंपदा मंत्री या नात्याने ११ ऑगस्ट २०२१ ला वारणा नदीच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करण्यास मान्यता दिली आणि या फेरनियोजनामुळे अतिरिक्त ६ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. म्हैसाळ प्रकल्प माध्यमातून या ६४ गावांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले.
मी स्वतः या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आणि फार कमी काळात हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला. कोरोनामुळे या प्रकल्पाचे काम झाले नाही असे म्हणणे फार चुकीचे आहे असेही जयंत पाटील स्पष्टपणे म्हणाले. या प्रकल्पाबाबत महाविकास आघाडीने कोणतीही दिरंगाई केली नाही. प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असून मंत्रिमंडळाने प्रकल्प पुढे घ्यावा आणि त्याला मान्यता द्यावी व प्रकल्प सुरू करून टाकावा असेही जयंत पाटील यांनी सरकारला सांगितले.
‘आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्हाला कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी’ अशी भूमिका २०१६ साली येथील ग्रामस्थांनी मांडली होती. आज या गावकऱ्यांची तशी कोणतीही भावना नाही.आमच्या जतचे ग्रामस्थ कर्नाटकाच्या कारस्थानाला बळी पडणार नाही असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.