सांगली – ज्योती मोरे.
ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ ते १८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर पी. बी. पाटील सोशल फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी दिली आहे.
दिनांक १२ ते १८ जानेवारी पर्यंत होणाऱ्या विविध कार्यक्रमाची रुपरेषा फोरमचे कोषाध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली आहे. दिनांक १४ जानेवारी दुपारी तीन वाजता प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने देण्यात येणारा एक लाख रुपयांचा कर्मयोगी पुरस्कार यंदा नाशिक येवल्याचे पैठणीचे निर्माते व समाजसेवक बाळकृष्ण नामदेव कापसे यांना देण्यात येणार आहे, या प्रसंगी कापसे यांची प्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर हे मुलाखत घेणार आहेत.
त्याच दिवशी सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे यावर्षीचा गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्काराने रोपवाटीका उद्योजक विश्वास यशवंत पाटील यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. १२ ते १६ जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १४ ते १७ जानेवारी दरम्यान रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन तसेच विविध कलात्मक वस्तुंचे भव्य कला प्रदर्शन, दिनांक १५ जानेवारीला एकतारी भजनी मंडळ स्पर्धा, दिनांक १६ जानेवारी रोजी ग्रुप डान्स स्पर्धा, १७ जानेवारी रोजी लावणी स्पर्धा आणि १८ जानेवारीला लेझीम स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या विविध सांस्कृतिक उपक्रमास जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी द्यावी असे आवाहन फोरमच्या बी. आर. थोरात आणि गौतम पाटील यांनी केले आहे.