Monday, December 23, 2024
Homeसामाजिकज्येष्ठा गौरी...व्रत करण्याची पद्धत...

ज्येष्ठा गौरी…व्रत करण्याची पद्धत…

ज्येष्ठा गौरी

भाद्रपद मासात येणार्‍या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामागील इतिहास आणि सण साजरा करण्याच्या पद्धती विषयी या लेखातून जाणून घेऊया.

तिथी : भाद्रपद शुद्ध अष्टमी

इतिहास आणि उद्देश : पुराणात अशी कथा आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

व्रत करण्याची पद्धत :

अ. हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. – ही एक रूढी आहे.)

आ. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.

इ. तिसर्‍या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.’

अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये : भाद्रपदातील महालक्ष्मीच्या (गौरीच्या) वेळी अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये. अशौचामुळे तेव्हा गौरीपूजन न करता आल्याने काही जण पुढे आश्विन मासात (महिन्यात) गौरीपूजन करतात, पण तसे करू नये. अशा प्रसंगी त्याचा लोप करणे (म्हणजे ते न करणे) युक्त होय.

दोरकग्रहण :

अ. ‘ज्येष्ठा गौरीच्या पूजेच्या वेळी दोरक ठेवून विसर्जनानंतर तो दोरक घेतला जातो. दोरक घेण्याच्या विधीस ‘दोरकग्रहण’ असे म्हणतात. दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे सोळा पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र होय. सोळा ही संख्या लक्ष्मीशी निगडित असल्यामुळे दोरकातही सोळा पदर असतात.

आ. हा दोरक अत्यंत शुभकारक आणि लक्ष्मीप्राप्ती करून देणारा असतो. घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात. काही प्रांतांत पुरुषही आपल्या हातात हा दोरक धारण करतात. काही जण हा दोरक आपल्या धनकोशात, धान्यकोठारात, वास्तूच्या पायात आणि देवघरात ठेवतात.

इ. ज्येष्ठा गौरीपूजन हा एक कुळाचार आहे. त्यामुळे कोश (मिळकतीचे साधन) आणि चुली (स्वयंपाकघर) निराळे होताच प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात हे व्रत करणे अत्यावश्यक असते.’

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती :

अ. सौभाग्याचे रक्षण होणे

काही वेळा स्त्रिया स्वत:च्या सौभाग्याचे रक्षण होण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीला उद्देशून ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. त्यामुळे व्रत करणार्‍या स्त्रियांवर महालक्ष्मीदेवीची कृपा होऊन त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते.

आ. ऐहिक आणि पारमार्थिक लाभ होणे

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने श्री गणेशासह रिद्धी आणि सिद्धी यांचे कृपाशीर्वाद लाभून ऐहिकदृष्ट्या भरभराट होते अन् आध्यात्मिक क्षेत्रात विविध सिद्धींची प्राप्ती होते.

इ. गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होणे

रिद्धी आणि सिद्धी यांसह कार्यरत असणारे गणेशतत्त्व पूर्ण असल्यामुळे ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने उपासकाला गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होतो.

गौरी आणि श्री गणेश यांना प्रार्थना !

‘हे गौरी आणि श्री गणेशा, तुमची कृपादृष्टी सर्वांवर अशीच अखंड राहू दे आणि सर्वांना धर्माचरण तसेच साधना करण्याची सुबुद्धी होऊ दे. व्यष्टी साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांमध्ये येणारे स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवरील अडथळे दूर होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संकलन- श्रीमती विभा चौधरी

संपर्क-7620831487

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: