खामगांव (बुलढाणा) – हेमंत जाधव
महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या आरोपीला अटक करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा व सदरचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे या आशयाचे निवेदन आज मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्भिडपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे.
शशिकांत वारीसे यांचा हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुदैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे.
हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणी करत तसेच तीव्र निषेध व्यक्त करून खामगाव मधील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने केली.