Sunday, December 22, 2024
Homeराज्यदीक्षाभूमी येथून उस्फुर्त प्रतिसादात पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात…

दीक्षाभूमी येथून उस्फुर्त प्रतिसादात पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात…

मताचे गठ्ठे पाहूनच न्याय मिळत असेल तर प्रत्येक पत्रकार एक गठ्ठा आहे: वसंत मुंडे….

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेला रविवारी (दि. 28) दीक्षाभूमी येथून राज्यभरातील पत्रकारांच्या प्रचंड प्रतिसादात सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शेकडो पत्रकारांना मार्गदर्शन करताना, वसंत मुंडे म्हणाले, राज्यकर्ते मताचे गठ्ठे पाहूनच समाजातील विविध घटकांसाठी योजना जाहीर करत असतील तर या राज्यातला प्रत्येक पत्रकार मताचा गठ्ठा आहे. याचा विचार करून राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहार संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर संवाद यात्रेला सुरुवात झाली.

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखालील बहुचर्चित राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेला रविवारी (दि.२८ जुलै २०२४) सुरूवात झाली. लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, हा संकल्प घेवून दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे,कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानुरकर, निलेश सोमाणी, महेश पाणसे, नितीन शिंदे,नयन मोढें, वैभव स्वामी ,शरद नागदेवे यांच्यासह राज्यभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

यावेळी पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले, घटना लिहिण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते. बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र त्यांनी काढले. यामुळे महामानव बाबासाहेबांनी जिथे दीक्षा घेतली, त्या दीक्षा भूमीतूनच पत्रकार संवाद यात्रा काढायची असे ठरवले होते. महामानव बाबासाहेबांच्या पावन अशा दीक्षाभूमीला वंदन करून पत्रकार संवाद यात्रा पुढे जाणार आहे. आजपर्यंत पत्रकार सर्वसामान्य माणसाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय, राजकीय प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या दरबारात मांडत आले आहेत. सर्वसामान्य माणसाचा आवाज बनत आले आहेत. कायम लोकांचा आवाज बनत आलेल्या पत्रकारांवर आज स्वतःसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे.

कारण कोरोना महामारीनंतर पत्रकार ज्या आवस्थेतून जात आहेत. जे प्रश्न आणि संकटांचा सामना करत आहेत, त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. पत्रकार हा समाजाचा एक घटक आहे, हे मानायला देखील राज्यकर्ते आणि प्रशासन तयार नाही. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी शासनाच्या काही ना काही योजना आहेत. परंतु पत्रकारांसाठी कोणत्याच योजना नाहीत. पत्रकार समाजातला एक घटक असेल तर त्याच्यासाठी शासनाच्या योजना का नाहीत? हे विचारण्यासाठी ही पत्रकार संवाद रॅली आहे. सरकार विविध घटकांचे मतांचे गठ्ठे पाहून त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर करत असेल तर सरकारने पत्रकारांचा मतांचा गठ्ठा किती मोठा आहे, हे देखील लक्षात घ्यावे, असे सांगत संवाद यात्रा जसजशी पुढे जाईल तसे लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थ मिळेल आणि राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नाबाबत गंभीर बनेल, असा विश्वास वसंत मुंडे यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना त्यांनी ही संवाद यात्रा पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, मालक, वर्तमान पत्रातील इतर कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचे शेवटी वसंत मुंडे म्हणाले. संवाद यात्रेत सर्व स्तरातील पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, विश्वासराव आरोटे म्हणाले, पत्रकार संवाद यात्रेची संकल्पना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांची होतीच, परंतु त्यांच्यात नेतृत्व आणि दातृत्व देखील आहे. संवाद यात्रा काढताना संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांला वसंतराव यांनी विश्वासात घेतले. यामुळेच आज संवाद यात्रेच्या शुभारंभाला राज्यभरातील सर्व स्तरातील पत्रकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे विश्वासराव आरोटे म्हणाले.

तर संपादक संतोष मानुरकर म्हणाले, आजचा पत्रकार संवाद यात्रेचा शुभारंभ झालेला 28 जूलै हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला जाणार आहे. ही यात्रा जेंव्हा मुंबई आणि मंत्रालयात जाईल तेंव्हा वसंतराव मुंडे हे राज्यभरातील पत्रकारांसाठी गोड बातमी देतील, असे मानुरकर म्हणाले. प्रास्ताविकात विभागीय अध्यक्ष प्रमोद शेंडे यांनी संवाद यात्रा मंत्रालयावर धडकल्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे हे नक्कीच पत्रकारांसाठी काही ना काही घेवून येतील असा विश्वास व्यक्त केला. दीक्षाभूमी येथील पत्रकार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संवाद यात्रेत राज्यभरातील
पत्रकारांच्या गाड्यांचा ताफा

पत्रकार आणि सर्व स्तरातील माध्यम कर्मी यांचे प्रश्न घेऊन दीक्षाभूमी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या संवाद रॅलीचा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे चंदन शिरवाडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. संवाद यात्रेचा पहिला मुक्काम महात्मा गांधींची पावन भूमी वर्धा येथे आहे. सेवाग्रामकडे पत्रकार संवाद रॅली जात असताना राज्यभरातील शेकडो पत्रकार आपल्या वाहनांसह रॅलीत सहभागी झाल्याने रॅलीतील वाहनांची रांग अर्धा ते एक किलोमीटर एवढी झाली होती. पत्रकार रॅलीचा हा ताफा आणि त्यांची एकजूट राज्यकर्त्यांना नक्कीच विचार करायला भाग पाडणार पाडणार असल्याचा विश्वास यावेळी पत्रकार बांधव व्यक्त करत होते.

50 संघटनांचा पाठिंबा
दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगीच राज्यभरातील वेगवेगळ्या सामाजिक आणि विचाराच्या संघटनांनी पत्रकार संवाद यात्रेला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे राज्यातील अनेक आजी माझी लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नाबाबत संवेदना दाखवत पत्रकारांच्या सोबत असल्याचे सांगितले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: