अकोला-पातूर रोडवरील घटना
पातूर – निशांत गवई
अकोला ते पातूर रोडस्थित असलेल्या माऊली बार समोर जेसीबी व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
पातूर पासून अकोल्याकडे जाताना सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या माऊली बार समोर आज दि.09/05/2023 रोजी रात्री सुमारे 8:00 वाजताच्या दरम्यान जेसीबी व दुचाकी समोरासमोर धडकून अपघात झाला असून सदर अपघाताची माहिती पातूर उपस्थित प्रत्यक्षदर्शीनी पातूर पोलिसांना दिली,
संबंधित माहितीवरून पातूर पोलीस स्टेशनचे चालक रमाकांत केकन, पत्रकार दुले खान युसुफ खान,निशांत गवई,प्रमोद कढोणे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे जेसीबी व दुचाकीचा आपसात अपघात झाल्याचे निदर्शनास आले असून एक युवक गंभीर अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले.
सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की,पातूर ते अकोला रोडवर असलेल्या माऊली बार अँड रेस्टॉरंट समोर अकोल्याहून पातूर कडे येत असलेल्या ऍक्टिव्हा क्र.- एम.एच. 30 ए.एस. 579 यास विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबी क्र.- एम. एच.30. बी.बी. 6985 या वाहनाने समोरासमोर धडक दिली,
ही धडक एवढी जबरदस्त होती की अक्षरशः दुचाकीचा चुराडा झाला असून दुचाकीस्वार ओमराज शिवहरी गावंडे (वय 26) रा.देऊळगाव हा गंभीर जखमी व गाडीवर मागे बसलेली त्याची आई रुक्मिणी बाई शिवहरी गावंडे हे जखमी झाले असून पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीस पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले असता गंभीर जखमी असलेल्या ओमराज गावंडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सदर प्रकरणी पातूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला असून वृत्त लिहिस्तोवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.