Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या चार झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात तीन जवान जागीच शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या सैनिकाचाही रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रात्री उशिरा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी हल्ले राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात दोन लष्करी वाहनांवर झाले. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोट तहसीलमधील बाफलियाज पोलीस स्टेशन मंडी रोडकडे जाणाऱ्या लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. काल संध्याकाळपासून या भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या संयुक्त कारवाईत हे जवान भाग घेणार होते.
जखमी जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवादी घात घालून हल्ले करत आहेत. शोध मोहिमेदरम्यान परवेझ अहमद उर्फ हरिस या दहशतवाद्याला अटक करण्यात किश्तवाड पोलिसांना यश आले आहे. भारतीय पोलीस गेल्या 18 वर्षांपासून या दहशतवाद्याचा शोध घेत होते. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर दिले. पोलिस आणि लष्कराची कारवाई सुरूच आहे.
या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात लष्करावरील हा हल्ला ऑक्टोबर २०२१ नंतरचा सहावा हल्ला आहे. पीर पंजाल रेंजमध्ये आतापर्यंत झालेल्या 6 हल्ल्यांमध्ये 29 लष्करी जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे, ज्यात दोन कॅप्टन आणि दोन जेसीओचा समावेश आहे. शहीद आणि जखमी जवानांची नावे लष्कराने अद्याप जाहीर केलेली नाहीत.
J&K | One more Army personnel succumbed to injuries. The death toll in the terrorist attack on two military vehicles in the Thanamandi area in the Rajouri sector is four now: Army Officials https://t.co/tpArIiVtYi
— ANI (@ANI) December 21, 2023