Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayतो मुले पळविण्याचा प्रकार नव्हे, तर गैरसमजुतीतून उडालेला गोंधळ…सोशल मीडियाने भान राखण्याची...

तो मुले पळविण्याचा प्रकार नव्हे, तर गैरसमजुतीतून उडालेला गोंधळ…सोशल मीडियाने भान राखण्याची गरज…

आकोट- संजय आठवले

आकोट शहरातील सोमवार वेस परिसरात मुले पळविणारी टोळी घुसली असून एका युवतीला पळवून नेताना त्या टोळीतील एका युवतीला लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे संदेश धडाधड सोशल मीडियावरून व्हायरल होताच काही काळ एकच खळबळ उडाल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले. सदर प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर मात्र त्याचा उलगडा होऊन हा सारा गोंधळ गैरसमजुतीने झाल्याचे स्पष्ट झाले. आणि साऱ्यांना हायसे वाटले. परंतु कोणत्याही प्रकाराची शहनिशा करूनच सोशल मीडियावाल्यांनी संदेश व्हायरल करण्याचे भान राखणे गरजेचे आहे हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

या घटनेची हकीकत अशी की नंदीपेठ परिसरात वीस बावीस वर्षाच्या कोवळ्या वयात लग्न केलेले एक जोडपे राहते. नवऱ्याचा एक मित्र आहे. त्यानें त्या नवऱ्याला त्याच्या बायकोविषयी काही बाही सांगितले. त्याने घरात दोन दिवसांपासून कुरबुर सुरू होती. वैतागून ती नवरी मुलगी त्या मित्राकडे जाऊन त्याच्याशी भांडली. तोही तिच्याशी अद्वातद्वा बोलला. त्याने संतापून ती नवरी मुलगी घराकडे परत येत असताना तिला गणगणे विद्यालयाजवळ शिवाजी महाविद्यालयात शिकणारी एक युवती दिसली. ती विद्यार्थिनी कुटासा येथील असून तिच्या मावशीला भेटण्यासाठी येत होती. या नवरी युवतीने त्या विद्यार्थिनीला तिचे नाव विचारले. तिने नाव सांगितले. त्यावर “तू खोटे बोलतेस” असे म्हणून या नवऱी युवतीने त्या विद्यार्थिनी युवतीचे आयकार्ड बघितले. त्याने ती विद्यार्थिनी घाबरली आणि जवळच असलेल्या तिच्या मावशीच्या घरात गेली. तिचा पाठलाग करून ही नवरी युवतीही तिच्या मागे गेली. जाताना ती त्या विद्यार्थिनीला काही बाही बोलत होती. त्यावर एकच गोंधळ उडाला. अनेक लोक गोळा झाले. त्यांनी त्या नवरी युवतीला बसवून ठेवले. आणि पोलिसांना पाचारण करून तिला त्यांचे स्वाधीन केले. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली. आणि मुले पकडणारी टोळी पकडल्याची एकच अफवा पसरली. या घटनेतील सत्य समजून न घेता उतावीळ सोशल मीडिया योद्ध्यानीही मुले पळविणारी टोळी पकडल्याचे संदेश धडाधड व्हायरल केले. त्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली.

इकडे ही सारी वरात पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्या नवरी युवतीने असे का केले? या प्रश्नाचा तिच्यावर भडीमार झाला. परंतु ती युवतीही गोंधळल्याने काहीच स्पष्ट सांगत नव्हती. हळूहळू तिचे चित्त स्थिर झाले आणि या रहस्याचा उलगडा झाला. ती युवती तिच्या नवऱ्याच्या ज्या मित्राकडे भांडायला गेली होती, त्याचेही प्रेम प्रकरण आहे. ते माहीत झाल्याने त्या मित्राच्या प्रेयसीला तिच्या घरच्यांनी चांगलेच बदडून काढले. त्याने तिच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला मार लागल्याने तिथे काळा चट्टा तयार झाला. त्या मित्राचे घरून भांडण करून येताना ह्या नवरी युवतीला जी विद्यार्थिनी युती दिसली तिच्याही डोळ्याचे वर तसाच चट्टा आहे. तो पाहून हिला वाटले की ही त्या मित्राचीच प्रेयसी आहे. म्हणून तिने तिची चौकशी केली. परंतु तिचे नाव वेगळे असल्याने नवरी युवतीला वाटले कि, ती आपल्याशी खोटे बोलते आहे. त्यामुळे तिच्याकडून खरे ऐकण्यासाठी ह्या नवरी युवतीने गैरसमजुतीतून गोंधळ घातला. हा सारा प्रकार लक्षात येताच सर्वजण चाट पडले. हे सारे सत्य उलगडल्यावर ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी ताकीद देऊन सारी वरात त्यांचे त्यांचे घरी रवाना केली. परंतु या प्रकाराने उतावीळ सोशल मीडिया बाबत मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी कोणत्याही घटनेची शहनिशा करण्याची आणि उतावीळ होऊन गुडघ्याला बाशिंग बांधण्याचा प्रकार न करता लोकांना सत्य माहिती देण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: