स्व. देवकीबाई बंग विद्यालयात 10वी 12वी च्या विध्यार्थ्यांना निरोप समारंभ…
नागपूर – शरद नागदेवे
हिंगणा- नागपूर -विद्यार्थ्यांनी सुनियोजितपणे ध्येय निश्चित करून विद्यार्थी जीवनाची वाटचाल योग्य दिशेने करून स्वतःचे भविष्य घडविले पाहिजे त्यातून समाज व पर्यायाने राष्ट्र निर्मितीचे कार्य होईल. असे प्रतिपादन स्व. देवकी बाई बंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा च्या सभागृहात आयोजित वर्ग 10 व वर्ग 12 वी यांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून रेशीमचे माजी संचालक कॅप्टन डॉ. एल.बी कलंत्री यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग होते.तर संस्थेच्या संचालिका सौ अरुणा महेश बंग, नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, प्राचार्य नितीन तुपेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या संचालिका अरुणा बंग त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे व आपल्या तालुक्याचे नाव आपल्या परिश्रमातून मोठे करा असे आवाहन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनी ने अतिशय उत्कृष्टपणे केले वर्ग दहावी व वर्ग बारावी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या भाषणातून शिक्षकांबद्दल आणि शाळेबद्दल असलेले प्रेम व्यक्त झाले. तसेच स्वरनाद च्या विद्यार्थ्यांनी देखील सुमधुर गाणे प्रस्तुत केले. आभार सचिन भांडारकर यांनी तर यशस्वीते करिता सर्व शिक्षक वृंद व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले