Saturday, November 9, 2024
Homeराज्यबौद्धिक संपदेला व्यावसायीकतेची सुवर्ण किनार प्राप्त होणे काळाची गरज - कुलगुरू डॉ....

बौद्धिक संपदेला व्यावसायीकतेची सुवर्ण किनार प्राप्त होणे काळाची गरज – कुलगुरू डॉ. शरद गडाख…

“स्पर्धात्मक युगातील बौद्धिक संपदा अधिकार: कल्पना शक्तीतून व्यावसायीकतेकडे” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

अकोला – संतोषकुमार गवई

ऐतिहासिक काळापासून बुद्धिमत्ता आणि कलाक्षेत्राचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित झाले असून काळाच्या ओघात मानव प्रजातीचे कल्याण व सामाजिक प्रगती साधण्याच्या हेतूने सर्जनशील कर्तुत्व, विवेकपूर्ण नितीमत्ता आणि अनन्य साधारण बुद्धी कौशल्यातूनच नवनवीन शोध व मानव प्रजातीच्या विकासासाठी पूरक असे तंत्रज्ञान विकसित झाल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी प्रतिपादित केले.

विद्यापीठा अंतर्गत शास्त्रज्ञ, तांत्रिक कर्मचारी व आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या बौद्धिक संपदा अधिकार कक्ष आणि जलद मार्ग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धात्मक युगातील बौद्धिक संपदा अधिकार: कल्पना शक्तीतून व्यावसायीकतेकडे” या महत्वपूर्ण विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज शुक्रवार दिनांक ३१ मे, २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. विद्यापीठाचे कुलगुरू,डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेखाली कृषी महाविद्यालय अकोलाच्या कमिटी हॉल येथे करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेच्या उद्घाटनपर सत्रामध्ये ते उपस्थितांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संबोधित होते. आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात डॉ. गडाख यांनी अलीकडील काळात व्यावसायीक स्पर्धेमुळे बौद्धिक संपदा अधिकाराचे हनन व गैरवापर होतांना निदर्शनास येत असल्याचे सांगताना त्याकरिता, बौद्धिक संपदेला कायदेशीररीत्या अधिकार प्रदान करून त्याचे सरंक्षण करण्याची तरतूद केल्या गेली आणि म्हणूनच कृषी शास्त्रज्ञ, तांत्रिक कर्मचारी व कृषी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा अधिकाराची माहिती होऊन बौद्धिक संपदेला व्यावसायीकतेची सुवर्ण किनार प्राप्त होणे काळाची गरज असल्याचे मौलिक प्रतिपादन देखील या प्रसंगी बोलतांना केले.

पुढे संबोधित करताना त्यांनी बौद्धिक संपदा अधिकाराचे कृषी संशोधनातील महत्व विषद करून नोंदणी व मंजुरीसाठी शिफारस करावयाचे पेटंट हे निवडक स्वरूपाचे, गुणवत्तापूर्ण व वापरकर्त्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असण्यावर भर देऊन त्यामध्ये व्यावसायीकतेच्या दृष्टीने वाव असावा असे मोलाचे प्रतिपादन केले. यानुषंगाने कृषी शास्त्रज्ञांची व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे अधोरेखित करतांना त्यांनी पेटंटची शिफारस करण्याच्या प्रक्रियेस गती प्राप्त होण्यासाठी देश पातळीवरील कार्यरत इतर कृषी विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेऊन संशोधकाने निर्मिलेले यंत्र किंवा तंत्रज्ञानाद्वारे शोधकर्त्यास तसेच संबधित विद्यापीठास झालेल्या आर्थिक प्राप्तीचा विचार करण्याची गरज प्रतिपादीत केली.

कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे वाण, ट्रेडमार्क आणि भौगोलिक निर्देशांक संदर्भात पेटंटच्या शिफारसी करण्यासाठी चांगला वाव असल्यामुळे शास्त्रज्ञाद्वारे बहुसंख्य शिफारसी केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून सदर कार्यशाळेच्या आयोजनाद्वारे भौतिक संपदा अधिकाराच्या कक्षा रुंदावण्यास निश्चितच मदत होऊन अपेक्षित सकारात्मक परिणाम नजीकच्या भविष्यात दृष्टी पथात येण्यास मोलाचा हातभार लागणार आहे असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी व्यासपीठावर संशोधन संचालक तथा विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा अधिकार कक्षाचे अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, राष्ट्रीय स्तरावरील व जे.पी.ओ. द्वारे प्रमाणित पेटंट तज्ञ प्रशिक्षक सहस्त्ररश्मी पुंड, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. तर सहयोगी अधिष्ठाता सर्वश्री डॉ. बाबाराव सावजी, डॉ. ययाति तायडे, डॉ.शैलेश हरणे, डॉ. राजेंद्र गाडे, यांचेसह सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ्, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी – विद्यार्थिनीची सभागृहात उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संशोधन संचालक तथा अध्यक्ष, बौद्धिक संपदा अधिकार कक्ष, डॉ. विलास खर्चे यांनी आपल्या संबोधनामध्ये सदर कार्यशाळेसाठी निश्चित केलेला विषयच मुळात काळाची गरज असल्याचे नमूद करून सदर कार्याशाळेमुळे कृषी शास्त्रज्ञामध्ये जनजागृती होत पेटंट संदर्भातील अनिश्चितता व संभ्रम दूर होऊन शिफारसीच्या कार्यास उपयुक्त चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

सदर कार्यशाळेद्वारे पेटंट मंजुरी प्रक्रियेला निश्चितच मोलाचा हातभार लागण्याच्या दृष्टीने अपेक्षित वातावरण निर्मिती झाली हि निश्चितच समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन करून प्रशिक्षण वर्गामध्ये सहभाग नोंदविलेल्या सर्व सहभागींचे अभिनंदन केले. तसेच या प्रशिक्षण वर्गामुळे आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी व पेटंट तज्ञ प्रशिक्षक श्री. सहस्त्ररश्मी पुंड यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये पेटंट संबंधी एकूणच जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील विस्तृत घडामोडीचा आढावा सोदाहरण विशद करून पेटंटचे महत्व विशद केले. सोबतच त्यांनी पेटंट संदर्भातील महत्व अधोरेखित करतांना वस्तूची निर्मिती, संरक्षण आणि व्यापारीकरण आदी बाबी स्पष्ट करतांना मानवी निर्मितीचे महत्व, अन्वेषण व नाविन्यपूर्ण संशोधन, बौद्धिक संपदा हक्क सरंक्षण, कार्यक्षमता निर्मिती आणि वाव विस्तारीकरण तसेच व्यावसायिक प्रभाव इत्यादी बाबत उपस्थितांचे प्रबोधन केले.

सदर प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनीय सत्राचे प्रास्ताविक करतांना मा. कुलगुरूंचे तांत्रिक सचिव तथा सचिव बौद्धिक संपदा कक्ष प्रा.डॉ. नितीन कोष्टी यांनी सदर प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश प्रतिपादित करून भौतिक संपदा अधिकार कक्ष, डॉ. पंदेकृवी अकोलाच्या विविधांगी तांत्रिक उपलब्धीचा आढावा सादर करून सहभागी कृषी संसोधाकाना व प्रशिक्षणार्थ्यांना कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

तत्पूर्वी, सदर प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनपर सत्राचा प्रारंभ व्यासपीठावरील मान्यवरांव्दारे आदरणीय डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आला.सदर कार्यशाळेमध्ये बौद्धिक संपदा अधिकारातर्गत आयोजित एकूण तीन तांत्रिक सत्रापैकी पहिल्या सत्रामध्ये बौद्धिक संपदा अधिकाराचे प्रकार आणि प्रकरणाच्या अध्ययनाचे फायदे, दुसऱ्या सत्रामध्ये बौद्धिक संपदा अधिकाराची प्रक्रिया आणि तिसऱ्या सत्रामध्ये पेटंटचा मसुदा तयार करणे,त्याच्या व्याप्तीचे मजबुतीकरण आणि दावा सुत्रीकरण या महत्वपूर्ण विषयां सोबतच शंका समाधानासाठी प्रश्नोत्तरांचा समावेश करण्यात आला होता.

या कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धिक संपदा कक्षाचे सदस्य प्रा.डॉ.सचिन शिंदे, यांनी केले तर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. मृदुलता देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, आज आयोजित या प्रशिक्षण वर्गामध्ये कृषी शास्त्रज्ञ अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी आचार्य पदवी अभ्यासक्रमाचे संशोधक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बौद्धिक संपदा अधिकार तसेच भविष्यातील शाश्वत शेती व ऐकूनच आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक पेटंटचे मर्म आत्मसात करून कृषी क्षेत्राच्या दिशा निश्चितीसाठी बौद्धिक संपदा अधिकार अंगीकार करण्याबद्दल कटीबद्धता व्यक्त केली.

समारोपीय सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. शरदराव गडाख भूषविले तथा सदर प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलीत.

सदर महत्वपूर्ण विषयावरील कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मा.कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनात आणि डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. पंदेकृवि, अकोला तथा अध्यक्ष, बौद्धिक संपदा अधिकार कक्ष, यांचे नेतृत्वात बौद्धिक संपदा कक्ष आणि जलद मार्ग समितीचे सदस्य डॉ. नितीन गुप्ता, विभाग प्रमुख (पुष्पशास्त्र व प्रांगण), डॉ. शशांक भराड, विभाग प्रमुख (फळशास्त्र), डॉ. नीरज सातपुते, सहयोगी प्राध्यापक आणि डॉ. विवेक खांबलकर, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या सहकार्याने संबंधित कक्षाचे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: