Friday, November 22, 2024
Homeराज्यती निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नव्हे…ती केवळ मतदार याद्या अद्यावत ठेवणेकरिता दिलेली सूचना…...

ती निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नव्हे…ती केवळ मतदार याद्या अद्यावत ठेवणेकरिता दिलेली सूचना… राज्य निवडणूक आयुक्तांच्या खुलाशाने निवडणुका पुन्हा लांबणीवर…

आकोट – संजय आठवले

राज्य निवडणूक आयोगाने गत ५ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे राज्यात मनपा, नपा, जि. प. यांच्या निवडणुका होणार असल्याच्या धारणेने संपूर्ण राज्यात एकच धांदल उडाली होती. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने दि.७ जुलै रोजी याबाबत आपले स्पष्टीकरण दिले असून ‘ते परिपत्रक म्हणजे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नव्हे तर ती केवळ मतदार यादी अद्यावत ठेवणेकरिता दिलेली सूचना’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या खुलाशाने या निवडणुका पुन्हा बेमुदत लांबणीवर जाणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या ५ जुलै रोजी च्या परिपत्रकामुळे येत्या माहे सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान राज्यातील २३ महानगरपालिका, २०७ नगरपालिका आणि २५ जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार असल्याची वार्ता राज्यभर पसरली. हा कालावधी अगदी उंबऱ्यावर आलेला आहे. त्यामुळे ह्या निवडणुकी संबंधित लोकांमध्ये एकच धांदल उडाली.

त्यातच राज्यात राजकीय अस्थिरता कायम आहे. राज्याचे मंत्रिमंडळ मोठमोठे हेलकावे खात आहे. सत्तेत सामील लोकांचे बस्तान अद्यापही नीट बसलेले नाही. अशा अस्थिर आणि बेभरवशाच्या स्थितीत निवडणूका लागल्याने सत्ताधाऱ्यांना मोठा झटका बसला असता. त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी ७ जुलै रोजी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी या संदर्भात सांगितले कि, राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेलो नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्याकरिता विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी १ जुलै २०२३ ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना ५ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्याकरिताच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते. आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष rase कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही मदान यांनी सांगितले.

त्यांच्या या स्पष्टीकरणाने या निवडणुका बेमुदत लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकांकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाराना मोठा धक्का बसला आहे. तर महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बेलगाम कारभार सुरू असल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: