Israel Gaza War : इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायली सैन्याने मंगळवारी गाझा पट्टीतील अल-अहली अरब रुग्णालयावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये किमान 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझामधील सत्ताधारी हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. प्रवक्त्याने सांगितले की, कोसळलेल्या रुग्णालयाच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याची भीती आहे. तथापि, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) हॉस्पिटलवर बॉम्बफेक नाकारली आणि हॉस्पिटलच्या स्फोटासाठी हमासच्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणास जबाबदार धरले.
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पुष्टी झाल्यास हा हल्ला 2008 पासून लढलेल्या पाच युद्धांमधील सर्वात प्राणघातक इस्रायली हवाई हल्ला असेल. इस्रायलने शहर आणि आसपासच्या भागातील सर्व रहिवाशांना दक्षिण गाझा पट्टीत हलवण्याचे आदेश दिल्यानंतर बॉम्बस्फोटापासून नागरिकांना वाचविण्यासाठी गाझा शहरातील अनेक रुग्णालये शेकडो लोकांसाठी आश्रयस्थान बनली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या प्राथमिक तपासातून असे सूचित होते की गाझा येथील हॉस्पिटलमध्ये हा स्फोट हमासच्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणामुळे झाला होता. त्याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, गाझाच्या बर्बर दहशतवाद्यांनी गाझा येथील हॉस्पिटलवर हल्ला केला आहे, त्यात IDFची कोणतीही भूमिका नाही हे संपूर्ण जगाला कळले पाहिजे. ज्यांनी आमच्या मुलांची निर्घृण हत्या केली त्यांनी स्वतःच्या मुलांचीही हत्या केली, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी, इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर एडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, रुग्णालयात मृत्यूंबाबत अद्याप कोणतेही तपशील नाहीत. “आम्ही तपशील मिळवू आणि लोकांना अपडेट करू,” ते म्हणाले. हा इस्रायलचा हवाई हल्ला होता की नाही याची मी पुष्टी करू शकत नाही.
डब्ल्यूएचओने गाझामधील रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध केला
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी गाझा येथील अल-अहली अरब रुग्णालयावर इस्रायली हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. डब्ल्यूएचओ उत्तर गाझामधील अल अहली अरब रुग्णालयावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो, असे त्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. प्राथमिक अहवालात शेकडो मृतांची शक्यता आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि आरोग्य सेवा त्वरित मिळावी अशी आमची मागणी आहे.
इजिप्तने गाझा रुग्णालयावरील इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला
इजिप्तने गाझा येथील अल-अहली अरब रुग्णालयावरील इस्रायली लष्करी हल्ल्याचा निषेध केला असून, हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे धोकादायक उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, निर्वासितांच्या छावण्यांवर जाणीवपूर्वक केलेला हा हल्ला मूलभूत मानवी मूल्यांचे उल्लंघन आहे.
BREAKING: At least 500 Palestinians killed in an Israeli air strike on al-Ahli Arab Hospital in the besieged Gaza Strip, says health ministry https://t.co/msxr0m1DFu pic.twitter.com/xwAksIn4Qn
— Al Jazeera English (@AJEnglish) October 17, 2023