राहुल मेस्त्री
एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने देशभरात आजादी का अमृत महोत्सव हा सण साजरा केला जात आहे. पण हे मिळालेले स्वातंत्र्य देशातील सर्व घटकांना मिळाले आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे?
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश स्वातंत्र्य झाला मात्र खरा पण जातीवाद्यांच्या अत्याचारातून देश कधी स्वतंत्र होणार ? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कारण याच भारत देशाला लाज वाटण्यासारखी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थान मधील जालोर जिल्ह्यात घडली असुन एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. या मुलाचा गुन्हा काय होता?कारण तो दलित होता. या दलित शाळकरी मुलाने शिक्षकाच्या मडक्यातील पाणी प्याल्याने त्याला आपला जीव गमावा लागला…
राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत शिकत असलेल्या एका दलित मुलाने शिक्षकाच्या मडक्यातील पाणी पिल्याने त्या शिक्षकाने त्या दलित मुलाला इतकी अमानुष मारहाण केली की त्या लहान मुलाच्या कानातील नस तुटल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
गेले 25 दिवस मृत्यूची झुंज देत असताना अखेर त्या दलित मुलाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनीच आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले पण जातीवाद्यापासून कधी स्वातंत्र्य मिळणार असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे?
या घडलेल्या घटनेमधील सदर शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्पुरली पोलीस स्टेशन येथे भीम ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कदम यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर निवेदन हवालदार डी.एस.कुंभार व हवालदार युवराज पाटील यांनी स्विकारुन वरिष्ठांकडे पाठवु असे सांगितले.याप्रसंगी प्रथमेश कांबळे अभिजीत कांबळे उपस्थित होते.