अकोला – अमोल साबळे
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याच्या घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांच्यासोबत पक्षातील अनेक बडे नेते आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ हे नेतेही अजित पवारांबरोबर आहेत.
शरद पवारांच्या जवळचे नेते अजित पवारांबरोबर असल्याने ही शरद पवारांची खेळी तर नव्हे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपला या बंडाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत आपणच नियुक्ती केली होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर शरद पवार यांचा या सगळ्याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले.
तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळचे आणि बडे नेते पवारांना सोडून गेल्याने याबाबत धुके अजूनही कायम आहे. याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.