रामटेक – राजू कापसे
दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक व समाज कल्याण, नागपूर यांच्या वतीने रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी जामा मस्जिद ट्रस्ट, रामटेक द्वारा संचालित मदरसा कासमिया रिजविया अहेले सुन्नत, रामटेक येथे अल्पसंख्याक हक्क दिवस निमित्त सदिच्छा भेट देऊन समस्यांबाबत चर्चा केली.
मदरसा येथे ५ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण असून पुढील शिक्षण स्थानिक शैक्षणिक संस्थेत किंवा नागपूर येथे पूर्ण केले जाते असे शिक्षकांनी सांगितले.याप्रसंगी मुदर्रीस जुल्फेकार अहेमद सिद्दिकी यांना उर्दू भाषेतील भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देण्यात आली.
संयुक्त राष्ट्र संघाने 1992 मध्ये अल्पसंख्याक हक्क दिवसाची सुरुवात केली असून धर्म,जात,भाषा व संस्कृतीचे संवर्धन करणे व बहुसंख्यांकांसोबत विकासात्मक दर्जा प्राप्त होण्यासाठी मदत करणे हा मुख्य उद्देश असल्याचे समतादूत राजेश राठोड यांनी सांगितले.महाराष्ट्रात ख्रिश्चन, मुस्लिम, शिख,बौद्ध, जैन व पारसी या धर्मीक समुहांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असून शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती करीता त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी शासन कटीबद्ध आहे.
यावेळी नागपूर समतादूत मोईन शेख यांनी भ्रमणध्वनी वरून विविध योजनांची माहिती दिली व अधिक माहितीसाठी हज हाऊस, नागपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळास भेट देण्यास सांगण्यात आले. शिष्यवृत्ती, उद्योग व धर्मनिरपेक्षतेवर चर्चा करण्यात आली. यावेळी हुसेन अख्तर नुरी,शाह रज्जाक सिद्धिकी,फिरोज जाफर छवारे प्रामुख्याने उपस्थित होते.