पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी राखीव जागा ठेवण्याचा मिळविला बहुमान…
नांदेड – महेंद्र गायकवाड
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत देशाबरोबर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट करणारी नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री माधवराव जाधव यांना राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्य सरकारने नुकतीच शिवछत्रपती व इतर पुरस्कारांची घोषणा केली असून आंतराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव यांना अंत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा सन २०२१-२२ चा शिवछञपती पुरस्कार घोषित करून शासनाने तिचा यथोचित सन्मान केला आहे. नांदेड जिल्ह्यात सदर पुरस्काराची मानकरी ठरलेली ती पहिली महिला खेळाडू आहे.
दरम्यान भाग्यश्री जाधव ही सध्या पॅरिस मध्ये असून ती वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत सहभागी झालेली आहे. तीने या स्पर्धेत चौथा क्रमांक प्राप्त करून सन २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी एक जागा राखीव ठेवण्याचा बहुमान मिळविला आहे.
नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट केली आहे.
दुबई येथे झालेल्या फाजा व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
बंगळूरू येथे ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये पोर्तुगाल येथे जागतिकस्तरावर झालेल्या आयवॉज २०२२ या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य व कास्य पदक मिळवून भारताबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक केला.
मार्च 2023 मध्ये उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स २०२३ या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व करीत कास्य पदक पटकावले आहे. बंगळूरु येथे दि.४ ते ८ मे या कालावधीत झालेल्या पाचव्या भारतीय ओपन पॅरा अथेलिटिक्स इंटर नॅशनल चॅम्पिअनशीप-2023 या स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी गोळाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
सध्या पॅरिस येथे सुरु असलेल्या. वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ती सहभागी झालेली असून तीने गोळाफेक क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकाविला आहे. त्याच बरोबर सन २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी एक जागा राखीव ठेवण्याचा बहुमान मिळविला आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे.
अवघ्या सहा वर्षाच्या क्रीडा प्रवासात भाग्यश्री जाधव यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण (बंगळूरु), सहाय्यक प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु) व गुरुबंधु पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या पुस्कारा बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भाग्यश्री जाधव म्हणाली की, मला माजी आमदार स्व. बापुसाहेब गोरठेकर, सेवानिवृत्त अधिकारी तथा भाजप नेते रामदास पाटील सुमठाणकर, अपंग संघटना, सेवाभावी, सामाजिक संघटना, शिक्षण संस्था, उपचार करणारे डॉक्टर यांचे मला वेळोवेळी सहकार्य केले लाभले. प्रसार माध्यमांनी माझे सदैव कौतूक केले या सर्वांची मी ऋणी आहे.