रामटेक – राजु कापसे
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघ 59 च्या निवडणूक निरीक्षक सुनिल कुमार यांनी मतदारसंघातील प्रमुख मतदान केंद्रे आणि निवडणूक संबंधित यंत्रणांना शुक्रवार(दि. 8) भेट दिली. यावेळी केंद्रांची पाहणी करुन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले रामटेक विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षकांनी तालुक्याच्या सीमेवरील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तसेच मतदारांशी चर्चाही केली.
रामटेक तालुक्यातील लांब आणि सीमेवर पवनी, झिझेरिया, मानेगाव टेक तसेच कन्हान, कांद्री, टेकाडी(को.ख.), गोंडेगाव, दहेगाव जोशी, चिंचभुवन, मनसर असलेल्या येथील मतदान केंद्राना निवडणूक निरीक्षक सुनील कुमार यांनी भेटी दिल्या. मतदान केंद्राची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्यात. तसेच युवक मतदारांशी संवाद साधला. तुम्ही मतदान करता का ? कसे करतात? तुमच्याजवळ मतदानकार्ड आहे का? आदी प्रश्न विचारून त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. बीएलओ यांच्या कडून मतदान यादी, ASD मतदार व घरून मतदान या बाबत केलेल्या कार्यवाहिचा आढावा घेण्यात आला.
अशा सुविधा करण्याबाबत सुचना
रामटेक विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सूचना फलक, दिशादर्शक, दिव्यांगासाठी रॅम्पची सुविधा, मतदार सहाय्य केंद्र, पुरेशी व्यवस्था, मंडप व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय, रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था तसेच मंडपात असलेल्या मतदान केंद्रानजीक मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा, तसेच दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा, पार्टीशन मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर लावण्यात येणार्या रांगांसाठी जागेची उपलब्धता आदी सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नियोजन करावयाचे आहे.