Sunday, December 22, 2024
Homeराज्यअमरावती विभागीय युवा महोत्सवात बुलढाण्यावर अन्याय..! संगीतकलेशी गद्दारी ! परीक्षकांविरोधात तक्रार...

अमरावती विभागीय युवा महोत्सवात बुलढाण्यावर अन्याय..! संगीतकलेशी गद्दारी ! परीक्षकांविरोधात तक्रार…

अमरावती – सगळ्याच क्षेत्रात आता लग्गेबाजी, वशीला आणि पक्षपातीपणा चालायला लागला. संगीतसारखी पवित्र कलाही अशुद्ध करण्याचा संतापजनक प्रकार अनेक ठिकाणी सुरु आहे. टेलिव्हीजनवरील रियॅलिटी शोच्या संगीत स्पर्धांमधील पार्शियालिटी आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोच आहे.

दमदार गायन करणारे प्रतिभासंपन्न कलाकार डावलून स्वर-ताल हुकलेल्यांना विजेता बनविण्याचे लुचाट धंदे कुठे ना कुठे बघण्यात येत आहे. मागील आठवड्यात अमरावती येथे विभागीय युवा महोत्सवात अशीच बेईमानी झाली. सर्वच बाबतीत उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या बुलढाण्याच्या टिमला डावलून अमरावतीच्या टिमला प्रथम क्रमांक देण्यात आला.

यासंबंधीची तक्रारही वरिष्ठांकडे देण्यात आली आहे. या संपूर्ण विवादात स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक केंद्रबिंदू आहेतच पण या परीक्षकांना दोन-दोनदा बोलाविणारे अमरावतीचे जिल्हा क्रीडा कार्यालयसुद्धा विवादास्पद ठरत आहे. अमरावती येथे विभागस्तरीय युवा महोत्सव मागील 8 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवाची जबाबदारी क्रीडा विभागाला देण्यात आली आहे.

अर्थात या जबाबदारीत क्रीडा विभाग वारंवार अपयशी आणि विवादीत ठरत असल्यामुळे शासनाने युवा महोत्सव क्रीडा विभागाकडून काढून शिक्षण विभाग, पर्यटन व सांस्कृतिक विभाग, गृहविभाग यांच्यापैकी कुणाकडेतरी सोपविली पाहीजे, हे महत्वाचे. क्रीडा विभागाकडून प्रथम जिल्हास्तरावर युवा महोत्सव घेण्यात आला. त्याठिकाणी प्रथम आलेल्यांना विभागीय स्तरावर पाठविण्यात आले.

अमरावती विभागाचा युवा महोत्सव 8 डिसेंबर रोजी अमरावती येथे श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह याठिकाणी दिवसभर रंगला. यात सामूहिक लोकगीत स्पधेर्चा समावेश होता. बुलढाण्यातून प्रथम आलेल्या फोक आर्टीस्ट ग्रृपने अमरावतीचा विभागीय युवा महोत्सव दणाणून सोडला.

‘टाच मारूनी घोड्याला…’ हे उडत्या चालीचे लोकगीत सादर करीत बुलढाण्याच्या ग्रृपने सभागृहात उपस्थितांची मनापासूनची दाद आणि उत्स्फूर्त टाळ्या मिळविल्या. इतरही जिल्ह्यांचे सादरीकरण चांगले झाले. पण छान, चांगले, उत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट मधील फरक कलारसिकांना कळतो, दुर्दैवानं तो परीक्षकांना कळला नाही. पब्लीक च्वाईस ठरलेल्या बुलढाण्याच्या टिमला डावलून अमरावतीच्या परीक्षकांनी आपल्याच गावाला प्राधान्य दिले.

झेनीथ ग्रृप साँग अमरावतीने ‘लखाबाई पोतराज आलाय भेटीला..’ सादर केले होते. गाणे समाधानकारक झाले. पण बुलढाण्याच्या तुलनेत कुठेच नव्हते. तरीही परीक्षकांनी अमरावतीला प्रथम क्रमांक दिला. यावर गदारोळ झाला. अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकार्‍यांनाही आश्चर्य वाटले. आयोजकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि उत्कृष्ट सादरीकरण करून अनेकांकडून कौतुकाची थाप मिळूनही प्रथम क्रमांक न मिळाल्यामुळे बुलढाण्याचे कलाकार हतोत्साहित झाले होते.

दूसरी बाब म्हणजे, अमरावतीच्या ग्रृपचे गाणे समूह प्रकारात मोडत नव्हते. तरीही त्याला क्रमांक मिळाला. बुलढाण्याच्या ग्रृपकडून यासंदर्भात दोन पानांची विस्तृत तक्रार करण्यात आली आहे. त्यात परीक्षकांच्या परीक्षणावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत. राहुल तायडे, प्रेम बैसने आणि स्वामिनी सहारे या तिघांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली.

ही भूमिका निश्चीतच संशयास्पद आहे. एक मात्र सत्य आहे की, विभागीय युवा महोत्सवात संगीत हरले.. कलेशी बेईमानी झाली.. ज्यांनी हे केलं असेल, ते आयोजक असोत, की, तिघा परीक्षकांपैकी कुणी एक किंवा दोघे, पण कलादेवता त्यांना भविष्यात अशी काही राहुन राहुन ‘हुल’ देईल की, त्यांचे म्यूझीक करीअर कब ‘बिघडे’ त्यांनाही कळणार नाही.

अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने 5 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव घेतला. या महोत्सवात लोकगीत स्पर्धेचे परीक्षणही या तिघांनी केले. याच तिघांना पुन्हा विभागीय स्तरावर संधी देण्यामागचे कारण कळू शकले नाही. एव्हढ्या मोठ्या अमरावतीत संगीत विषयामध्ये ‘डॉक्टरेट’ किंवा ‘एम.ए.’ पदवी प्राप्त कुणी व्यक्ती परीक्षक म्हणून अमरावती जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांना मिळाली नाही काय ?

लग्न-आर्केस्ट्रांमध्ये गाणी गाणारे गायक परीक्षक म्हणून निवडले गेले. अर्थात अशा गायकांना परीक्षणाची समज नसते, असा आमचा निष्कर्ष मुळीच नाही. पण कलेशी ईमान, सुरांशी प्रामाणिक आणि सत्यावर विश्वास असणारे परीक्षक निवडले गेले पाहीजेे. परीक्षकांवरील आरोपांबाबतच्या तक्रारीचे अमरावती क्रीडा विभागाने काय केले देव श्री ‘गणेश’ जाणे ! पण योग्य सोडून अयोग्यला संधी देणे परीक्षकांना शोभत नाही.

विभागीय स्पर्धेसाठी एकाच शहरातील परीक्षक का निवडावे ? संगीताचे सखोल ज्ञान असणारे पदवी प्राप्त प्राध्यापकांना आयोजकांनी का आमंत्रीत केले नाही? परीक्षक निवडतांना तो निःपक्ष असल्याची खात्री केली गेली पाहीजे. स्पर्धेत सादरीकरण करणार्‍या टिमसोबत परीक्षकांचे काही लागे-बांधे तर नाहीत ? हे सुद्धा तपासले पाहीजे. मागास जिल्हा असलेल्या बुलढाण्यातून ताकदीचे प्रतिभाशाली कलाकार महानगरच्या लोकांना सहन होणे शक्य नाही, हे कटू सत्य आहे..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: