आकोट – संजय आठवले
आकोट तालुक्यातील ग्रामपंचायत वडाळी देशमुखचे अपात्र सरपंच यांना सरपंच पदी पुन्हा कायम करण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी हा आदेश पारित करून हे सरपंच व सदस्य पद पुन्हा बहाल केले आहे.
या घटनेची हकीगत अशी कि, ग्रामपंचायत वडाळी देशमुखचे सरपंच पदी प्रवीण पंजाबराव शिंगाडे हे निवडून आले होते. त्यांनी केलेल्या गैरकृत्यांची तक्रार सचिन अरुण वाहूरवाघ यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडे केली.
तक्रारीमध्ये शिंगाडे यांना अपात्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली त्यावर पूर्ण चौकशी अंती विभागीय आयुक्त अमरावती यांनी शिंगाडे हे सरपंच व सदस्य पदी राहण्यास अयोग्य असल्याचा निवाडा दिला.
त्यावर ग्रामसचिव देशमुख यांनी वडाळी देशमुख येथील सरपंच पद रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे दि. २१.२.२०२२ रोजी सादर केला.
या अहवालाचे अनुषंगाने ग्रामपंचायत वडाळी देशमुखच्या सरपंच पदाकरिता जिल्हाधिकारी अकोला यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार दि. ५.४.२०२२ रोजी सरपंच पदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये सौ. कल्पना गणेश बोडखे या सरपंच पदी निवडून आल्या. यादरम्यान आपल्याला अपात्र ठरविल्याने व्यथित झालेल्या शिंगाडे यांनी उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल केली.
न्यायालयाने ही याचिका दि.१८.४.२०२२ रोजी निकाली काढली. या निर्णयात न्यायालयाने नमूद केले कि, शिंगाडे यांनी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कडे दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णयाचे अधीन राहून हे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
त्यावर ग्रामविकास मंत्री यांनी आपल्याकडील याचिका निकाली काढली. दि. १७.७.२०२३ रोजी ग्रामविकास मंत्री यांनी याचिकाकर्ता प्रवीण शिंगाडे यांना दिलासा दिला. आणि विभागीय आयुक्त अमरावती यांनी शिंगाडे यांना अपात्र घोषित केल्याचा निवाडा रद्द ठरविला.
मंत्रालयाच्या या निर्णयाने शिंगाडे यांना सरपंच व सदस्यपदी कायम ठेवण्यात आले आहे. या निर्णयाचे अधीन राहून ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती आकोट यांनी प्रवीण पंजाबराव शिंगाडे यांना ग्रामपंचायत वडाळ देशमुखचे कामकाज नियमानुसार करण्याचा आदेश पारित केला आहे.