Saturday, November 23, 2024
Homeदेश७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद यंदा भारताकडे...

७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद यंदा भारताकडे…

तब्बल २७ वर्षांनी मिळाला बहुमान

बहुप्रतिक्षित ७१व्या मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी भारताची निवड झाली आहे हे जाहीर करताना मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनला आनंद होत आहे.

भारताला असलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्याला उत्तेजन देण्याप्रती देशाची बांधिलकी तसेच महिलांच्या सक्षमीकरणाप्रती वाटणारी कळकळ यांमुळे हा प्रतिष्ठेचा सन्मान भारताला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातील चैतन्यपूर्ण परंपरा, संस्कृती आणि इतिहासामुळे हे सौंदर्य व फॅशनचे जागतिक केंद्र झाले आहे. मोहक निसर्ग, महत्त्वाच्या खुणा आणि आतिथ्यशीलता ही तर भारताची वैशिष्ट्ये आहेतच. ७१वी मिस वर्ल्ड स्पर्धा (२०२३) सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून उदात्त कामांना उत्तेजन देणार आहे,

स्पर्धकांना त्यांच्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यास तसेच समाजासाठी योगदान देण्यास प्रेरणा देणार आहे. ऐश्वर्या राय- बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी आदी बॉलिवूडमधील अभिनेत्रींसह अनेक भारतीय स्त्रियांनी हा जागतिक स्तरावरील सन्मान प्राप्त केला आहे.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जुलिया मोर्ली यावेळी म्हणाल्या,“७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी भारतात होणार आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. ३० वर्षांहूनही अधिक पूर्वी मी जेव्हा प्रथम भारताला भेट दिली त्या क्षणापासून मला या अविश्वसनीय देशाबद्दल खूप जिव्हाळा वाटत आला आहे!

तुमची अनन्यसाधारण व वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक दर्जाची आकर्षणे आणि श्वास रोखून धरायला लावणारी ठिकाणे उर्वरित जगाला कधी एकदा दाखवतो असे आम्हाला झाले आहे. एका असामान्य मिस वर्ल्ड फेस्टिवलची निर्मिती करण्यासाठी मिस वर्ल्ड लिमिटेड व पीएमई एण्टरटेन्मेंट एकत्र येत आहेत.

७१व्या मिस वर्ल्ड २०२३ मध्ये, १३० राष्ट्रीय विजेत्यांचा एक महिन्यांचा ‘अविश्वसनीय भारतातील’ प्रवास  दाखवला जाणार आहे. ७१वी आणि सर्वांत नेत्रदीपक अशी मिस वर्ल्ड अंतिम फेरी प्रस्तुत करताना आम्ही या प्रवासाचे दर्शन घडवणार आहोत. हे प्रत्यक्षात करण्यासाठी डॉ. सयद झफर इस्लाम यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानते.”

७१वी मिस वर्ल्ड २०२३ ही स्पर्धा म्हणजे सौंदर्य, वैविध्य व सक्षमीकरणाचा गौरव करणारे एक असामान्य व्यासपीठ ठरणार आहे. १३०हून अधिक देशांतील स्पर्धक भारतात एकत्र येऊन त्यांच्या अनन्यसाधारण प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे व अनुकंपेचे दर्शन सर्वांना घडवणार आहेत.

या स्पर्धक कठोर स्पर्धांच्या एका मालिकेत सहभागी होणार आहेत. यांत प्रतिभादर्शन, क्रीडाविषयक आव्हाने आणि सेवाभावी उपक्रमांचा समावेश असेल. स्पर्धकांना बदलाच्या अपवादात्मक प्रतिनिधी करणाऱ्या त्यांच्यातील गुणांवर प्रकाश टाकण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. स्पर्धकांच्या निवडीसाठी अनेक फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. नोव्हेंबर/डिसेंबर २०२३ मध्ये नियोजित महाअंतिम फेरीपूर्वी एक महिना या फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.

“७१व्या मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगाचे हार्दिक स्वागत करण्यासाठी तसेच देशाची शान, सौंदर्य व प्रगतीशील चैतन्य सर्वांपुढे आणण्यासाठी, भारत सज्ज आहे. या असामान्य प्रवासाला सर्व मिळून सुरुवात करत असतानाच, स्त्रियांमधील बदल घडवून आणण्याच्या शक्तीचा गौरव करण्यासाठी आमच्यासोबत या,” असे २०२२ सालची मिस वर्ल्ड कॅरोलिना बीलावस्का म्हणाली.

स्त्रियांमधील सौंदर्य व बुद्धीचा गौरव करणे हा मिस वर्ल्ड किताबाचा दीर्घकाळापासून लौकिक आहे. स्त्रीच्या शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न ही स्पर्धा करते. हे एक व्यासपीठ असून, स्वत:चे म्हणणे मांडण्याची, स्वत:ला महत्त्वाच्या वाटणाऱ्या बाबींचे समर्थन करण्याची आणि जागतिक स्तरावर सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्याची क्षमता ते देते. ७१व्या मिस वर्ल्ड २०२३चे यजमानपद भूषवण्याच्या माध्यमातून, अर्थपूर्ण संभाषण व कृतींमधील एक संप्रेरक घटक म्हणून त्यांचे मूल्य वाढवण्याचे उद्दिष्ट भारतापुढे आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: