Monday, December 23, 2024
Homeराज्यशिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या ऐतिहासिक सभेने भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली: नाना पटोले...

शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या ऐतिहासिक सभेने भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली: नाना पटोले…

बाळासाहेब ठाकरेंनीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएला दोनदा पाठिंबा दिला, हे विसरले का?

तीन-चार पक्ष फिरणाऱ्या व ५० खोक्यांसाठी गद्दारी करणाऱ्या लाचारांनी राहुल गांधी व काँग्रेसवर बोलू नये.

बानवकुळे हेच मुळात सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पहा!

काँग्रेसकडून जनतेला ५ न्यायासह २५ गॅरंटी, मोदीसारखी जुमलेबाजी व फेकूगिरी नव्हे.

मुंबई, दि. १८ मार्च

शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासीक सभेने एक नवा इतिहास रचला आहे. इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांच्या उपस्थितीत या सभेला ‘जनसागर’ लोटला होता. शिवाजी पार्कवरील सभेने भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत सारख्यांना धडकी भरली आहे.

शिवाजी पार्कवरील सभेने ‘मोदानी’ सरकारच्या अंताची सुरुवात झाल्याने, त्यांची झोप उडाली आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. शिवाजी पार्कवरील सभा व राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत नाना पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सर्वात मोठे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवतात या राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची धमक आधी भाजपाने दाखवावी.

शिवाजी पार्कवरील सभेने देशात परिवर्तनाचा संकेत दिला आहे हे स्पष्ट असून पराभवाच्या भितीपोटी भाजपा व गद्दारसेनेचे लाचार या सभेवर अनावश्यक टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केल्यापासून भाजपाला पोटशूळ उठला आहे. ‘हिंदुत्व खतरे में’ अशी कोल्हेकुई भाजपाचे नेते करत असतात व त्यांच्याच सुरात सुर मिसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे री ओढत असतात.

भाजपाने देशभरातील विविध राज्यात राजकीय तडजोडी केल्या, काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत सरकार स्थापन करून भाजपाने दीड दोन वर्ष संसार केला तेंव्हा यांचे ‘हिंदुत्व खतरे में’ आले नाही का? बाळासाहेबांचा एखादा व्हिडिओ दाखवून ते काँग्रेस विरोधी होते हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसच संबंध लपून राहिलेले नाहीत. बाळासाहेबांनीच काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, याची माहिती कदाचित या लोकांना नसावी किंवा त्यांना विसरण्याचा रोग जडला असावा त्यामुळे या मंडळींनी उगाच बोंबाबोंब करु नये.

शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी नव्हती, हास्यजत्रा होती अशी बाष्कळ बडबड करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेची गर्दी पाहण्यासाठी मोठ्या भिंगाचा चष्मा वापरुन पहावे. मोदींच्या सभेला भाडोत्री गर्दी कशी जमावावी लागली, हे यवतमाळच्या सभेने अख्या महाराष्ट्रानेही पाहिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हेच एक ‘विनोदीपात्र’ आहेत आणि भाजपात बावनकुळेंची काय किंमत आहे, हे विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यावरून दिसले आहे. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला उमेदवारीही मिळत नाही, यावरुन पक्षातील त्यांची किंमत काय, हे कळते.

काँग्रेस पक्षाने ५ न्यायासह २५ गॅरंटी दिल्या आहेत, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा या गॅरंटीतून प्रयत्न केला जाणार आहे. ही काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे, कोणत्या एका व्यक्तीची नाही, मोदींसारखी फेकूगिरी व जुमेलबाजी तर नक्कीच नाही.

बावनकुळेंची पात्रता असेल तर त्यांनी नक्कीच या गॅरंटींचा अभ्यास करावा. मागील १० वर्षात भाजपा व मोदींनी काय दिवे लावलेत ते भाजपाच्या नेत्यांना व त्यांच्या विकास रथांना गावागातून लोक हुसकावून लावत आहे, यावरून दिसतेच आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, पक्ष, चिन्ह चोरून नेले आहे. तथाकथीत महाशक्तीच्या नादाला लागून त्यांनी केलेले कृत्य खरे शिवसैनिक विसरणार नाहीतच पण ५० खोक्यांसाठी केलेल्या गद्दारांनी ‘हिंदु खतरे में’ म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे.

लोकसभेच्या एका एका जागेसाठी भाजपाकडे भीक मागवी लागणाऱ्या व प्रत्येकवेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणाऱ्या एकनाथ शिंदे यांना काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बोलण्याचा अधिकार काय?. बाळासाहेब ठाकरे असताना ज्या लोकांची ‘मातोश्री’च्या बाहेर स्टुलवर बसण्याची लायकी नाही तेच लोक खरी शिवसेना आमचीच, असा उसना आव आणत आहेत.

खुर्चीसाठी व ५० खोक्यांसाठी आपले ‘इमान’ घाण ठेवणाऱ्या गद्दार उदय सामंत, प्रविण दरेकर या पालापाचोळ्याबद्दल बोलावे एवढी त्यांची कुवत नाही. दररोज सकाळी भोंगा वाजवण्याचे काम त्यांच्या मालकांनी त्यांना दिले आहे ते त्यांनी करावे व तेवढीच त्यांची ‘पात्रता’ आहे.

शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीची ‘शक्ती’ पाहून भाजपासह गद्दारसेनेची तंतरली आहे. देशात परिवर्तन होणार हे अटळ असून बेरोजगार होणाऱ्या भाजपा व गद्दारसेनेच्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या गॅरंटीतून एक वर्षाची ‘अप्रांटीसशिप’ नक्की मिळेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: