अमरावती – दारापुर येथे श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती अंतर्गत विक्रमशिला तंत्रनिकेतन २०१० पासून कार्यरत आहे. तंत्रनिकेतनामध्ये एकूण ३६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तंत्रनिकेतनाच्या हितार्थ अनेक वर्षापसून नियमित सेवेवर रुजू आहेत. परंतु गत काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या सेवेविषयीच्या तक्रारी उदयास आल्या आहेत.
वाढत्या समस्यांचे निवारण करण्याकरिता कर्मचाऱ्यांनी अनेकदा तंत्रनिकेतनाचे प्रभारी प्राचार्य मनीष मनोहर पाटील तथा दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा. पी. आर. एस. राव यांना वारंवार निवेदने दिलेली होती, परंतु सचिवांनी तक्रारींकडे कायम काना डोळा केला आहे. कर्मचाऱ्यांनी तक्रारींचे निवारण करण्याकरिता अधिकृत अशी कर्मचारी संघटनेची स्थापना केली असून तंत्रनिकेतनातील तक्रार निवारण समितीस १० मार्च २०२३ रोजी तक्रार दाखल केली आहे,
परंतु प्राचार्यांनी त्यावर कुठलाही अहवाल सादर केला नसून संस्थेचे सचिव प्रा.पी.आर.एस. राव यांनी तंत्रनिकेतनातील कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक बंद करण्याकरिता प्राचार्यांना तोंडी निर्देश दिलेले आहेत. सर्वोतोपरी कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण कसे होईल ह्याचा प्रयत्न व्यवस्थापनामार्फत सुरु आहे.
कर्मचारी आधीच आर्थिक विवंचनेत आहेत, अश्यात हा प्रकार अतिशय निंदनीय आहे ह्या प्रकारातून उद्या जर कोण्या कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाली तर सर्वस्वी संस्था पदाधिकारी जबादार राहतील अशी आर्त हाक कर्मचार्यांनी दिली असून ह्या सर्व अनुषंगाने विक्रमशिला तंत्रनिकेतन दारापुर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे.
तक्रारींचे निवारण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे स्पष्ट मत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा.मोहित प्र.गावंडे, उपाध्यक्ष प्रा.सुकेश ल.कोरडे तथा संघटनेचे सचिव श्री.प्रदीप खु.मोहोड व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.