श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेसाठी ‘नवीन’ टीम इंडियाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव उपकर्णधार असेल. तर रोहित शर्मा वनडे मालिकेत पुनरागमन करेल. तो संघाची धुरा सांभाळणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची सुरुवात T20 सामन्याने होणार आहे. पहिला टी-२० सामना ३ जानेवारीला मुंबईत होणार आहे.
T20 संघात एकही वरिष्ठ खेळाडू नाही, पंतही बाहेर
रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा टी-20 मालिकेसाठी नव्या टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, राहुलच्या अनुपस्थितीचे कारण त्याचे अथिया शेट्टीसोबतचे लग्न असल्याचे मानले जात आहे. 2024 टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून विराट, राहुल आणि रोहित यांना या फॉरमॅटमध्ये निवडले जाणार नाही, असे संकेत आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंतला दोन्ही फॉरमॅटमधून वगळण्यात आले आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इशान किशन भारताचा यष्टिरक्षक असेल.
शिवम मावी आणि मुकेश कुमार हे नवे चेहरे असतील
श्रेयस अय्यरचाही टी-२० संघात समावेश करण्यात आलेला नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर तो टी-20 संघात होता. गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनाही टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. शिवम मावी आणि मुकेश कुमार हे नवे चेहरे असतील. नुकत्याच झालेल्या मिनी लिलावात शिवम मावी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू होता. त्याला गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमारलाही देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. आयपीएल लिलावात मुकेशला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक पंड्या (क), सूर्यकुमार यादव (वीसी), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल , अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
धवन आणि पंत वनडे संघातून बाहेर
रोहित शर्मा वनडे मालिकेसाठी पुनरागमन करणार आहे. यासोबतच कोहली आणि राहुलचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, राहुलची उपकर्णधार पदावरून पदावनत करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. शिखर धवनचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत धवन संघाचा कर्णधार होता. धवनच्या जागी शुभमन गिलचा सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पंतचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. विकेटकीपरसाठी इशान किशन आणि केएल राहुल यांची पहिली पसंती असेल. याशिवाय मोहम्मद शमीही संघात परतणार आहे. सुंदर, चहल, कुलदीप, अक्षर, सिराज आणि उमरान यांनी स्थान मिळवले. त्याचवेळी अर्शदीपचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही वनडे संघात स्थान देण्यात आले नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिका पूर्ण वेळापत्रक
पहिला T20 – ३ जानेवारी – मुंबई
दुसरा T20 – ५ जानेवारी – पुणे
तिसरा T20 – ७ जानेवारी – राजकोट
पहिला वनडे – १२ जानेवारी – गुवाहाटी
दुसरा वनडे – १५ जानेवारी – कोलकाता
तिसरा वनडे – १८ जानेवारी – त्रिवेंद्रम