IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेतून पूर्णपणे बाहेर आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो पहिल्या दोन कसोटीत खेळू शकला नाही. उर्वरित सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकाश दीप सिंगचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत झालेल्या दोन कसोटीत 1-1 ने बरोबरीत आहेत.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध होणार नाही.” बोर्ड कोहलीच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो आणि समर्थन करतो.रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांची संघात निवड करण्यात आली आहे. दोघेही जखमी झाल्याने दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नाहीत. निवड होऊनही ते खेळणार हे निश्चित नाही. बोर्डाने माहिती दिली की जडेजा आणि केएल राहुलचा सहभाग बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाकडून फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन आहे.
उर्वरित तीन सामने राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे होणार आहेत
तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. तर चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाणार आहे.
मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर., कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
श्रेयस अय्यर बाहेर
मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरलाही पुढील तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. अय्यर दुखापतीमुळे बाहेर आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) त्याच्या पुढील प्रगतीवर लक्ष ठेवेल. फॉरवर्ड डिफेन्स खेळताना अय्यरने पाठीत कडकपणा आणि कंबरेच्या भागात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, बीसीसीआयने अय्यरच्या दुखापतीबाबत काहीही खुलासा केलेला नाही. अशा स्थितीत खराब फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आकाश दीपला संधी मिळाली
उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी आकाश दीपची निवड करण्याचा निर्णय वरिष्ठ निवड समितीने घेतला आहे. आवेश खान बाहेर आहे. कसोटी संघासोबत बेंचवर बसण्यापेक्षा रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे अधिक चांगले असेल, असे निवड समितीचे मत आहे. आकाशला वरिष्ठ संघासोबत सुधारण्याची संधी मिळेल.