IND vs AUS :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावत टीम इंडियाला पाच विकेटने विजय मिळवून दिला. राहुलच्या या शानदार खेळीनंतर अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. त्यात भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादचाही समावेश होता. प्रसाद यांनी ट्विट करून केएल राहुलचे कौतुक केले. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार मीम्स शेअर केले.
नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये लोकेश राहुलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. यानंतर व्यंकटेश प्रसादने संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले आणि सोशल मीडियावर आकाश चोप्रासोबत वादही झाला. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता. कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात राहुलच्या जागी गिलला संधी देण्यात आली आणि चौथ्या सामन्यातही गिलने शानदार शतक झळकावले.
वानखेडमध्ये केएल राहुलने 91 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्याच्या खेळीत सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तो फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद 16 अशी होती. यानंतर तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊनच परतला. यादरम्यान त्याने हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजासोबत दोन उत्कृष्ट भागीदारी केल्या.
या सामन्यानंतर व्यंकटेश प्रसादने लिहिले, “दबावाखाली उत्तम संयम आणि केएल राहुलकडून शानदार खेळी. रवींद्र जडेजाने शानदार खेळ केला आणि भारताला विजय मिळवून दिला.” यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर खूप एन्जॉय केले.
काय घडलं मॅचमध्ये?
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 188 धावा केल्या होत्या. मिचेल मार्शने सर्वाधिक 81 धावा केल्या. भारताकडून शमी आणि सिराजने प्रत्येकी तीन बळी घेतले. यानंतर 39 धावांत चार विकेट गमावल्या, पण लोकेश राहुलच्या नाबाद 75 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना पाच विकेटने जिंकला.