गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले
विद्यार्थी, शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी कोल्हापूर-हुपरी मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्या वाढवाव्यात; अन्यथा रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट व अवधूत साळोखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागीय अधिकाऱ्यांना दिला.
या मार्गावरील एसटी बसेसच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. बस वेळेत न येणे आणि न थांबणे असे प्रकार होत असल्याने प्रवाशांना विशेषतः विद्यार्थी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.
महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे उंचगाव, मनेरमळा, गडमुडशिंगी, व्यंकटेश पार्क, सूतगिरणी परिसर, चव्हाणवाडी, न्यू वाडदे आणि सांगवडे परिसरातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना आर्थिक फटका बसत असून गैरसोय होत आहे.
महामंडळाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना पोपट दांगट म्हणाले की एका बाजूला शासन आपल्या दारी म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र विद्यार्थी, शेतकरी वर्ग, व्यापारी, नोकरदार यांना एसटी बस वेळेवर मिळत नाही.
बसफेऱ्यांमध्ये त्वरित वाढ करून विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश द्यावा. या व्यवस्थेत २० ऑगस्ट पर्यंत सुधारणा न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
ग्रामीण जिल्हा समन्वयक दत्ता पाटील, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत, अपंगसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले यांच्यासह शिवसैनिकांनी कोल्हापूर विभागीय अधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडली. आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदनही यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले.