अहेरी/आलापल्ली :- मिलिंद खोंड
अहेरी येथे अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या शुभारंभाने न्याय थेट दुर्गम भागातील मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी जनतेपर्यत पोहोचला आहे .असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज अहेरी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, यांच्या हस्ते अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे फीत कापुन उद्घाटन करण्यात आले.यावेळी आदिवासी पारंपारिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुका मुख्यालयाला जिल्हा व सत्र न्यायालय मंजुरी होऊन उद्घाटन आज रोजी 22 जुलै 2023 ला संपन्न झाले.
न्यायमूर्ती भूषण गवई सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि सन्माननीय मुख्य अतिथी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य आभासी स्वरूपात तसेच अतिथी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती संजय मेहरे उच्च न्यायालय, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय न्यायमूर्ती श्री महेंद्र चांदवाणी उच्च न्यायालय,
मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री उदय शुक्ला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली यांच्या उपस्थितीत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अहेरी यांचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी अहेरी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रविशंकर बावनकर, अहेरी वकील संघाचे अध्यक्ष ऍड.राजेंद्रप्रसाद मेंगनवार जिल्हाधिकारी ,संजय मिणा, गडचिरोलीचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना न्या.गवई म्हणाले दुर्गम भागातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी जिल्हा मुख्यालयी जाणे सोईचे नव्हते .अहेरी सारख्या तालुका मुख्यालयी सत्र न्यायालयाची आवश्यकता होती. अहेरी तालुका वकील संघाने सातत्याने या मागणीसाठी पाठपुरावा केला उपमुख्यमंत्री ,तथा गडचिरोली चे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पाऊले उचलत अहेरी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी हिरवी झेंडी दाखवली.
न्याय हा सर्व पर्यंत पोहोचला पाहिजे न्याय घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे मुख्य प्रहार पासून दूर असलेल्या वंचित आदिवासींना न्यायापासून दूर ठेवणे म्हणजे न्याय नाकारणे असे होते त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या शुभारंभाने न्याय हा आदिवासी जनतेपर्यंत त्यांच्या दारापर्यंत पोहोचला आहे सामाजिक समता निर्माण करणे सर्वांचे कर्तव्य आहे त्यासाठी न्यायपालिका व विधिमंडळाने एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमात आभासी पध्दतीने सहभागी झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले, अहेरी येथे अतिरिक्त सत्र न्यायालय होण्यासाठी अहेरी वकील संघ व माजी पालकमंत्री राजे अंबरीश राव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता भौगोलिक दृष्ट्या दुर्गम असलेल्या या जिल्ह्याच्या अडचणी लक्ष ठेवून या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जातीने लक्ष ठेवून आहो. अहेरी येथे अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या शुभारंभाने याचा फायदा अहेरी उपविभागातील तीन लाख जनतेला व 750 गावांना होणार आहे.
सुदृढ लोकशाहीसाठी एक चांगली न्यायव्यवस्था असणे अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा न्याय मागण्यासाठी जावे लागेल त्यासाठी तिथे जाण्यासाठी चांगली सुविधा असली पाहिजे व भीती वाटून देन ,त्यासाठी अश्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या करणं त्याचं विस्तारीकरण करणे महत्वाचे आहे. असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे श. उदय शुक्ला यांनी प्रास्ताविक तर ऍड.राजेंद्रप्रसाद मेंगनवार यांनी मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली..