आकोट – संजय आठवले
तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा येथे शेतीचे वादातून सख्ख्या बहिणीने आपली दोन मुले व पतीचे सहाय्याने आपलेच दोन भाऊ व त्यांची दोन अल्पवयीन मुले यांना ठार केल्याचे निष्पन्न झाल्याने आकोट न्यायालयाने पती-पत्नी व एक मुलगा यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आकोटचे इतिहासात फाशीच्या शिक्षेचा फैसला प्रथमच सुनावण्यात आला असून त्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.
या घटनेची हकीगत अशी कि, द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे रा. राहुल नगर आकोट हिने आपल्या भावांकडे वारसा हक्काने जमिनीचा हिस्सा मागितला. त्यांनी तो न दिल्याने तेल्हारा दिवाणी न्यायालयात तिने खटला दाखल केला. हा खटला सुरू असतानाच द्वारकाबाईने तिचे भाऊ धनराज व बाबुराव यांचे शेतात पेरणी केली. त्यावर या दोघा भावांनी स्वतः दुसरी पेरणी केली. त्यावरून ह्या बहिण भावांमध्ये नेहमी वाद होत होते.
दि.२८.६.२०१५ रोजी दुपारी ३ वाजता चे दरम्यान द्वारकाबाई ही पुन्हा शेतात पेरणी करीत असताना तिचा भाऊ धनराज व त्याची दोन मुले शुभम आणि गौरव यांचा तिचेशी वाद झाला. त्यानंतर ही मंडळी गावात परतली. गावात आल्यानंतर द्वारका बाईने तिचा मुलगा श्याम ह्यास फोन करून गावात बोलाविले. त्यावरून तिचा पती हरिभाऊ, श्याम आणि त्याचा लहान भाऊ हे तिघेजण गावात आले.
गवात आल्यावर या चौघांनी संगनमत केले आणि वाद उकरून काढून धनराज सुखदेव चर्हाटे, शुभम धनराज चर्हाटे, गौरव धनराज चर्हाटे आणि बाबुराव सुखदेव चर्हाटे ह्या चौघांवर विळा, चाकू व कुऱ्हाड अशा घातक शास्त्रांनी हल्ला चढविला. आणि चौघांचेही गळे चिरून व पोट फाडून त्यांना जिवानिशी ठार केले. घटनेची हकीगत कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आणि संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
चर्हाटे परिवारातील चारही जणांना शेतीचे हिश्शाचे कारणावरून आरोपीतांनी जिवे मारल्याचे साक्षी पुराव्यांमध्ये सिद्ध झाले. याप्रकरणी पो. नि. भास्कर तवर आणि पोउनि हेमंत चौधरी यांनी तपास केला. प्रकरणातील पंचनामा तेल्हारा पोलीस निरीक्षक अन्वर शेख यांनी केला. तपासानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले.
सदर आरोप पत्रानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने भादवी ३०२, ३२३, ५०६, ३४ नुसार दोषारोपण केले. प्रकरणात सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी एकंदर २१ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, नोडल अधिकारी, सीए रिपोर्ट तथा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात युक्तिवाद करताना सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे न्यायासनास सांगितले.
आपले संपूर्ण कसब पणाला लावून सरकारी वकील इंगोले यांनी अपराध सिद्ध आरोपी फाशीचे शिक्षेस पात्र असल्याचे न्यायालयात सांगितले. आपले कथना पुष्ट्यर्थ त्यांनी सरन्यायालयाचे सहा निवाडे न्यायासनासमोर प्रस्तुत केले. क्रुरतेचा कळस गाठलेल्या आरोपींना शिक्षेत दयामाया दाखविल्यास त्याचा समाजात अनिष्ट संदेश जाईल असेही त्यांनी न्यायालयास सांगितले. हा युक्तिवाद दि. ३.५.२०२४ रोजी करण्यात आला.
सरकारी वकील जी. एल. इंगोले यांचे दमदार युक्तीवादापुढे आरोपींचे वकील यांनी नमते घेऊन न्यायालय देईल ती शिक्षा स्वीकार असल्याचे सांगितले. तोच धागा पकडून आरोपींनीही याप्रकरणी काहीही म्हणणे नसल्याचे न्यायालयात सांगितले. हा सारा युक्तिवाद ऐकून आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी या प्रकरणात आज रोजी आरोपीतांना दोषी मानून तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.
हा फैसला घोषित करताना न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शिक्षेचे स्वरूप कथन केले. त्यानुसार आरोपी द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे, हरिभाऊ राजाराम तेलगोटे, श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे यांना भादवि कलम ३२३,३४ मधून दोषमुक्त करण्यात आले.
तर भादवी ३०२ मध्ये तिन्ही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व प्रत्येकी ५० हजार रुपये द्रव्यदंड आणि हा दंड न भरल्यास पाच वर्षे अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. भादवी कलम ५०६ (२) ३४ मध्ये ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये द्रव्य दंड आणि हा द्रव्य दंडा न भरल्यास एक वर्ष अधिकचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
या सोबतच मयतांच्या कायदेशीर वारसास नुकसान भरपाई योजनेअंतर्गत आर्थिक व अन्य सहाय्याकरीता शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठवावयाचा प्रस्ताव सर्व पूर्तता करून पाठविणे करिता या न्याय निर्णयाची प्रत सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांना पाठविण्याचा आदेशही पारित केला.
येथे उल्लेखनीय आहे कि, या प्रकरणातील आरोपी हरिभाऊ राजाराम तेलगोटे याने मिलिंद महाविद्यालय संभाजीनगर येथून फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स या विषयात एम. एस. सी. केले असून तो मॅथ्स या विषयात महाविद्यालयातून टॉपर विद्यार्थी म्हणून सन १९८६ मध्ये गौरविल्या गेला होता. त्यानंतर बीएड करून त्याने जालना येथे शिक्षकाची नोकरीही केली. परंतु न्यूरोलॉजीचा त्रास असल्याने नोकरी सोडून तो गावी परतला होता.
याच प्रकरणातील त्याचा आरोपी मुलगा श्याम याने सुद्धा मिलिंद महाविद्यालय संभाजीनगर येथे फिजिक्स, केमिस्ट्री या विषयातून बीएससी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तेथे एनसीसी पथकात असताना त्याने २६ जानेवारी रोजी दिल्ली येथील राजपथावर संचलन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बराक ओबामा होते. तर आरोपी द्वारकाबाई ही मात्र अशिक्षित आहे.