बिलोली – महेश जाधव
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून तालुक्यात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेत तालुक्यातील भाजपा मधील गटातटातीलमतभेद दूर करून स्थानीक नेत्यांचा भरणा आहे तर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात स्थानिक नेत्यांच्या ऐवजी चवडीवरील चर्चातुनच प्रचार होत आहे.जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या पक्षांतराचा फटका चिखलीकरांना बसणार का अशी एकंदरीत परिस्थिती सध्या तालुक्यात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टर्म मधील प्रचार अंतिम टप्यात आला असून पहिल्याच टप्यात भाजपाचे उमेदवारांच्या प्रचारात देशाचे गृहमंत्री अमित शहा,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,नुकतेच काँग्रेसला सोडचिठी देऊन भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या माजी खा.भास्करराव खतगावकर यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.
त्या तुलनेत काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या पहिल्या टप्यात मात्र काँग्रेसच्या अमित देशमुख यांच्या व्यतिरिक्त एकही देशपातळीसह राज्यपातळीवरील एकही नेता प्रचारात फिरकला नाही.एकीकडे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेत्यांसह तालुक्यातील भाजपातील स्थानिक पुढारी आपसातील मतभेद विसरून प्रचारासाठी तालुका पिंजून काढत आहेत.
त्या तुलनेत तालुक्यात एकही काँग्रेसचा बडा चेहरा नसतांना वसंतराव चव्हाण यांचा प्रचार मात्र गावपातळीच्या चावडीवरील चर्चेतून होत असल्याची परिस्थिती दिसत आहे.एकंदरीत चावडीवरील चर्चेत माजी मुख्यमंत्री व माजी खासदार यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी कार्यकर्त्यांचे स्थानिक राजकारण इच्छा नसतांना स्थानिक विरोधकांच्या दावणीला बांधण्यास भाग पाडले त्यामुळे चावडीवर मतदार स्थानिक लोकप्रतिनिधींचे ही ऐकावयास तयार नसल्याच्या चर्चा रंगत आहेत.
त्यामुळे तालुक्यात सध्या भाजपाच्या उमेदवारांचा प्रचारासाठी स्थानिक नेते,कार्यकर्ते फिरत असतांना मात्र काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचारात कार्यकर्त्यांचं भरणा कमी असला तरी चावडीवरील चर्चातुन प्रचार होत असतांना दिसत आहे.एकंदरीत माजी मुख्यमंत्री व माजी खासदार यांचा भाजपा प्रवेश हा चिखलीकरांच्या पथ्यावर पडतो की काय अशी परिस्थिती आहे.