नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील 22 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप व महाविकास आघाडीने दावा केला असून प्रथमदर्शनी भाजप ने सरशी केल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण जोध यांच्या लोहारी सावंगा ग्रामपंचायत व भाजपचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चौहान यांनी बेलोना ग्रामपंचायत मध्ये वर्चस्व राखण्यास यश मिळविले आहे.
तालुक्यात २२ ग्रामपंचायती करिता मतदान झाले. आजच्या निकालात अंबाडा देशमुख ग्रामपंचायत सरपंच व सदस्य अविरोध आले. सरपंच प्रमिला बाबुराव बारई यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. २१ ग्रामपंचायती च्या सरपंच व सदस्य पदाकरिता झालेल्या निवडणुकीची आज तहसील कार्यालय परिसरात मतमोजणी पार पडली. निवडून येणाऱ्या उमेदवार व गटाच्या समर्थकानुसार २२पैकी भाजप १०, राष्ट्रवादी काँग्रेस ७ , अपक्ष ३, शिवसेना १, काँग्रेस १ असे संख्याबळ असे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या माजी पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर यांच्या नुसार १६ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला तर भाजपचे महामंत्री शामराव बारई यांनी १२ ग्रामपंचायतीवर विजयाचा दावा केला आहे.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे च्या तालुका प्रमुख अजय बालपांडे यांनी ४ ग्रामपंचायतीवर दावा सांगितला आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्ष चिन्हावर लढविल्या जात नाही. स्थानिक स्तरावर आघाडी , गट निर्माण करून लढविल्या जातात त्यामुळे प्रत्यक्ष कोणत्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.