मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना अजुही थांबायचं नाव घेत नसून काल शुक्रवारी रात्री आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान जमावाने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. तर गुरुवारी रात्री, केंद्रीय मंत्री आर.के. रंजन यांचे इम्फाळमधील कोंगबा येथील निवास्थान जमावाने जाळण्याचा प्रयत्न केला होता.
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवाई येथे रात्रभर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंफाळ पश्चिम येथील इरिंगबाग पोलीस ठाणे लुटण्यात आली आणि आमदार बिस्वजित यांच्या घरालाही आग लावण्यात आली.
आंदोलकांना रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर रॅपिड एक्शन फोर्स (RAF) यांनी मध्यरात्रीपर्यंत इंफाळमध्ये संयुक्त मार्च काढला. ते म्हणाले की सुमारे एक हजारांच्या जमावाने राजवाडा संकुलाच्या जवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला.
जमावाला शांत करण्यासाठी आरएएफने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबराच्या गोळ्याही सोडल्या. मध्यरात्री आंदोलकांनी शिंजेमाई येथील भाजप कार्यालयाचा घेराव केला, मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. जमावाने भाजपच्या महिला विभागाच्या अध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला.
मणिपूरमध्ये ३ मेपासून अनुसूचित जमाती (एसटी) वर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून मैतई आणि कुकी या दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मणिपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.