Sunday, December 22, 2024
Homeराज्यकिनवट तालुक्यात मोफत रेशनसाठी २० रुपये आकारून मेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार...

किनवट तालुक्यात मोफत रेशनसाठी २० रुपये आकारून मेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरू…

शुभम शिंदे

किनवट – देशात जवळपास वर्षभरापासून सरकारने सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य वाटपाची योजना चालू केली आहे. हे रेशन लाभार्थ्यांना संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत अखंडितपणे दिले जाईल. यासाठी तुम्हाला रेशन डीलरला एक रुपयाही देण्याची गरज नाही.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत देशातील सुमारे 81 कोटी लोक मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत नागरिकांना गहू, हरभरा, तांदूळ फ्रीमध्ये दिला जातो. अन्न आणि पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर 2022 मधील अन्नधान्यानुसार डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशनची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर अन्नधान्य संपल्यावर मोफत सेवा बंद करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. मात्र, डिसेंबर 2023 पर्यंत सरकारनेच मोफत रेशन देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, 2023 या वर्षात 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याची तरतूद आहे.

परंतु आदिवासी डोंगराळ भाग असणारा किनवट तालुका मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहे. आधीच तालुक्यात पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यात वेळी-अवेळी होणाऱ्या पावसाने मजुरी मिळत नाहीये. अशा परस्थितीमध्ये जो मजूर आधीच मरणाला टेकलाय त्याच्याकडून मोफत असणाऱ्या रेशनसाठी पैसे उकळून तालुक्यात ‘मेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा’ प्रकार सुरू आहे.

राज्यात आणि देशात जरी रेशन धारकांना मोफत रेशन दिले जात असेल तरी शहरात आणि तालुक्यात मोलमजुरी करून खाणाऱ्या गरीब रेशन धारकांकडून रेशन दुकानदार २० रुपये आकारत असल्याचं भयाण वास्तव किनवटमध्ये पाहायला मिळत आहे.मोफत रेशन सुविधेचा लाभ घेणारे बहुतांश नागरिक हे अशिक्षित आहेत,त्यामुळे दुकानदाराने सांगितलेली रक्कम ते निमूटपणे अदा करतात.

मात्र याबद्दल काही सुशिक्षित नागरिकांनी याबद्दल दुकानदारांना जाब विचारला असता ‘ रेशन फुकट आहे पण रेशनचा मालं उतरवण्यासाठी लागणारी हमाली तुमचा बाप आणून देणार का?’ असा दम देतं त्यांनाही शांत केलं जातंय.
याबद्दल आमच्याकडे तक्रार करणाऱ्या नागरिकांना तुम्ही तहसील कार्यालय अथवा उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटा असे सांगितले असता, आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली हे दुकानदारांना कळलं तर आमचं रेशन बंद होईल या भीतीने नागरिक तोंड बंद करून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे एकतर सरकारने मोफत रेशनचा गवगवा बंद करावा अथवा इथे येऊन दुकानदार आकारत असलेले २० रुपये बंद करावे, अशी विनंती येथील नागरिक करत आहेत. तसेच रेशन दुकानदार मोफत रेशनसाठी २०-३० रुपये आकारत असल्याची तक्रार आमच्याकडेही आल्या आहेत,त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ अशा दुकानदारांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करावी लागेल असा सज्जड दम वजा इशारा सामाजिक कार्यकर्ते धीरज नेम्मानिवार यांनी दिला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: