न्युज डेस्क – अमरावती शहरात प्लॅस्टिकमुक्ती मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत गुरुवारी ट्रान्सपोर्ट गल्ली इतवारा बाजार येथे एक ट्रक प्लॅस्टिक व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या निर्देशावरुन महानगरपालिकेच्या स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभागातील पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, प्लॅस्टिकमुक्त मोहीम सुरूच राहणार असून, दररोज तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरात प्लॅस्टिकबंदी असूनही प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येतो. प्लॅस्टिकबंदी मोहिमेंतर्गत नागरिकांची जनजागृती करून नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले जाते.
मात्र तरीदेखील प्लॅस्टिकमुक्ती होतांना दिसून येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेंतर्गत शहरातील व्यावसायिकांकडे तपासणी करून महानगरपालिकेच्या पथकाने प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. यात गुरुवारी ग्लास, पत्रावळी तसेच प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत प्लॅस्टिकबंदीसाठी महानगरपालिका पथकदेखील प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी प्लॅस्टिकबंदी मोहिमेत सहभागी होऊन प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत उपायुक्त श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, योगेश कोल्हे, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ निरीक्षक विकी जेधे, ए.के. गोहर, डी.एन. कलोसे, ए.एम. सैय्यद, पी.जी. जोशी, आवेश शेख, निरज तिवारी, शुभम राऊतकर उपस्थित होते.
दरम्यान, प्लॅस्टिकबंदी मोहिमेत सर्वच व्यावसायिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे व शहर प्लॅस्टिकमुक्त करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.