धीरज घोलप
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागच्या राजाला अवघ्या चार दिवसांमध्ये दीड कोटींपेक्षा अधिक देणगी पैशांच्या स्वरुपात भक्तांकडून देण्यात आले आहे. तर २ हजार १७९ ग्रॅम सोने तर १७ हजार ५९३ ग्रॅम चांदी दान करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसांपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेक भाविक त्यांनी केलेले नवस फेडण्यासाठी लालबागच्या राजाच्या दरबारात येतात. तर अनेक भाविक राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे मुखदर्शनाबरोबरच नवसाची रांगही भली मोठी लागली आहे. आपल्या भाविकांना भरभरून देणार्या लालबागच्या राजालाही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी दिली जात आहे.
अवघ्या चार दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये १ कोटी ४४ लाख ८० हजारांची रक्कम देणगी स्वरुपात भाविकांनी टाकली आहे. त्याचबरोबर भाविकांकडून सोने व चांदीचे दागिनेही मोठ्या प्रमाणात दिले आहेत.
चार दिवसांमध्ये भाविकांनी २,१७९.२१० ग्रॅम इतके वजनाचे सोन्याचे दागिने तर १७,५९३ ग्रॅम इतके चांदीचे दागिने आपल्या लाडक्या बाप्पाला देणगी स्वरुपात दिले आहेत. भाविकांकडून देण्यात येणारी देणगी मोजण्यासाठी लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि बँकांचे अधिकारी रात्रंदिवस काम करत असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.