Saturday, November 23, 2024
Homeराज्यसर्पदंश झाल्यास तत्काळ दवाखान्यात घेऊन जा - समतादूत राजेश राठोड...

सर्पदंश झाल्यास तत्काळ दवाखान्यात घेऊन जा – समतादूत राजेश राठोड…

रामटेक – राजू कापसे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक व पंचायत समिती, रामटेक यांच्या वतीने जयसेवा आदर्श हायस्कूल, पवनी येथे सर्पदंश झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘सर्प विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका सौ.दुर्गावती सरीयाम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड व मौदा तालुका समतादूत ओमप्रकाश डोले उपस्थित होते.सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन व पुष्पगुच्छाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सध्या पावसाळा सुरू असून सापांच्या बिळात पाणी गेल्याने साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात.

नागरिकांनी जमिनीवर खाली झोपी जाऊ नये, घरातील वस्तूंची रचना अडचणीची असू नये.प्रत्येकाने स्वतः ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत राजेश राठोड यांनी प्रतिपादन केले. साप चावल्यानंतर चिरा मारू नये, तोंडाने विष ओढण्याचा प्रयत्न करू नये. साप चावल्याचे दोन दातांची खूण आढळल्यास वरच्या बाजूला रूमाल अधिक आवळून बांधू नये.

साप विषारी होता की बिन विषारी यावर चर्चा करत न बसता ताबडतोब दवाखान्यात घेऊन जावे. बुवा,बाबा,भुमक,धागे दोरे करण्यात अजिबात वेळ घालवू नये.सापाला कान नसतात.कंपनाने तो सावजाचे वेध घेतो, सापाला अंधूक दिसते तो कोणाचा ही डूक धरून बदला घेऊ शकत नाही,साप मनुष्य रूप धारण करू शकत नाही, सापांच्या डोक्यावर मणी नसतो,सापाचे पेय दुध नसून उंदीर,किडे,बेडकांना तो आपले भक्ष्य बनवतो इ.बाबत चर्चा करण्यात आली.

ओमप्रकाश डोले यांनी विषारी साप व बिनविषारी सापांची सविस्तर माहिती दिली.नाग,मण्यार,घोणस व फुरसे हे चार प्रकारचे साप प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळतात यावर आपले मत मांडले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक लक्ष्मीकांत कळंबे यांनी तर आभार शिक्षक गुलाब त्रिकाळ यांनी मानले.

तेजस्विनी मरस्कोल्हे, प्रिया जिजिते, नव्या राऊत,आरूषी टेकाम, सुप्रिया उईके इ. विद्यार्थ्यांनी विज्ञान व अंधश्रद्धा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक संजय धोटे, धर्मराज नागपुरे,गोपाल बडवाईक,रिद्धेश्वर बावनथडे व मीनाकुमारी राऊत सह विद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक मा.सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, निबंधक इंदिरा अस्वार, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी व जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: