महेंद्र गायकवाड
नांदेड
बिलोली शहरात सतत दोन दिवस चोरी व घरफोडी झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले असून दोन विविध घटनेत अज्ञात चोरटयाविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बाजार गल्ली येथील भारतबाई भीमराव रामटक्के व त्यांच्या घरातील सर्व नातेवाईक 23 जुलै रोजी रात्री जेवण करून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रामटक्के यांच्या घराच्या भिंतीवरून घराच्या आत प्रवेश करून सासऱ्याच्या ईलाजा साठी ठेवलेले वीस हजार रुपये व चंचित ठेवलेली सोन्याची पोत,मंगळसूत्र असे दीड तोळ्याचे सोने असा एकूण ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी भारतबाई रामटक्के यांनी दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात चोरटयाविरुद्ध गुरुन 129/2023 कलम 457,380 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोना मुदेमवार हे करित आहेत.अन्य एका घटनेत सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले.शहरातील दत्त मंदिर जवळ सेवानिवृत्त शिक्षक मनोहर सोळंके हे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.दिनांक 26 जुलै रोजी सोळंके हे घराच्या दारास कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व चोरट्यांनी घरातील आलमारीचे लॉक तोडून आलमारीत ठेवलेले नगदी रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 40000 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक मनोहर सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुरन 132/2023 कलम 454,380 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दोन दिवसाच्या अंतराने घडलेल्या चोरी व घरफोडीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.