Friday, November 22, 2024
Homeराजकीयबडनेरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची भाऊ गर्दीत लाडक्या बहिणीचेही मोठ नाव...

बडनेरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची भाऊ गर्दीत लाडक्या बहिणीचेही मोठ नाव…

अमरावती : मच्छिंद्र भटकर
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी करीता सर्वच पक्षात रस्सीखेच दिसून येत आहे.काही धनदांडगे इच्छूक उमेदवार तर पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरू अशी भुमिका घेत साम दाम दंड भेदाचा वापर करित रात्र दिवस कार्यकर्त्यासह अप्रत्यक्ष प्रचार कामी लागल्याचे चित्र बडनेरा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
बडनेरा मतदार संघात 70 टक्के मतदार हा अमरावती आणि बडनेरा शहरातील आहे. तर 30 टक्के मतदार हा बडनेरा लगतच्या 104 गावांमध्ये ग्रामीण मतदार आहे. साडेतीन लाखाच्या वर मतदार असणाऱ्या बडनेरा मतदारसंघात 2019 चा कौल अपक्ष आमदार रवी राणा यांना देऊन त्यांना हॅट्रिक साधण्याची संधी या मतदारसंघातील मतदारांनी दीली होती. आता 2024 च्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांना चौकार साधण्याच्या बाजूने कौल मिळतो की काय की बडनेरा विधानसभा मतदारसंघात धक्कादायक परिवर्तन घडवून आणतो याबाबतचे समीकरण निवडणूक रणधुमाळी नंतरच स्पष्ट होईल.

2004 च्या अगोदर बडनेरा मतदार संघ शिवसेनेचा गड मानला जायचा मात्र 2004 च्या निवडणुकीत पहिल्यांदा सुलभा खोडके यांनी वडनेरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला 2009 च्या निवडणुकीत मात्र बडनेरा मतदार संघाची फेर रचना करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुका धामणगाव रेल्वे मतदार मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला. तर अमरावती शहरातील राधानगर गाडगे नगर आणि विदर्भ महाविद्यालय परिसर हा बडनेरा मतदारसंघातून अमरावती मतदारसंघात समाविष्ट केला गेला. यासोबतच वलगाव मतदार संघ संपुष्टात येऊन वलगाव मतदार संघात येणारा भाग हा बडनेरा आणि तिवसा मतदार संघात विभागण्यात आला. 2004 ते 2009 पर्यंत आमदार म्हणून सुद्धा खोडके यांचा झंजावात बडनेरा मतदारसंघात सतत पहायला मिळाला. सुलभा खोडके पुन्हा एकदा बडनेरा मतदारसंघातून विजयी होणार अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर सुद्धा रवी राणा यांची राजकारणात अचानक एन्ट्री झाली. आणि अवघ्या काही महिन्यातच रवी राणा आणि बडनेरा मतदारसंघ पिंजून काढून 2009 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि धक्कादायक विजय मिळविला. व तेव्हापासून मागे वळून न पाहता चक्क 2019 पर्यंत आमदारकीची हॅट्रिक संपादन केली.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा खासदार म्हणून त्यांच्यासोबत होत्या. खासदार सोबत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत निश्चितच वाढला होता अशा परिस्थितीत आमदार राणा यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेनेतील अनेकांनी कंबर कसली होती. आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेनेचे इच्छुक उमेदवार दणकावून कामाला लागले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा विजय झाला असला तरी बडनेरा मतदारसंघात मात्र नवनीत राणा यांना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यापेक्षा दहा हजाराच्या जवळपास कमी मते मिळाल्याने बडनेरा मतदार संघात त्यावेळी रवी राणा यांची जादू चालणार नाही अशी अपेक्षा आमदार रवी राणा यांच्या विरोधकांना होती. मात्र त्यांचा अपेक्षाभंग करून आमदार रवी राणा यांनी हॅट्रिक मिळवण्यात यश मिळवले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हिंदू ,मुस्लिम, शीख,इसाई, दलित यांची सेक्युलर भूमिका सोडून कट्टर हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारत भारतीय जनता पार्टीचा पदर धरल्यामुळे सेक्युलर मतदारांनी या निवडणुकीत त्यांना चक्क नाकारले व खासदार बळवंत वानखडे यांना निवडून आणले. आमदार रवी राणा यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्यामुळे होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अडचणीचे ठरू शकते. आमदार रवी राणा यांचा पराभव आपणच करू शकतो असा दावा करीत शिवसेना आणि भाजपातील उमेदवारांमध्ये सुरू असणारी रस्सीखेच हीच सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बडनेरा मतदारसंघात ठरत आहे. अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी मतदारसंघात बडनेरा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ निवडणुकीदरम्यान असतो यावेळी निवडणूक पूर्वीच बदलणारा मतदारसंघ आमदार उमेदवार कोण असेल या चर्चेला उधाण आले आहे शिवसेनेत प्रितीताई बंड समर्थक आणि श्री खराटे यांच्या उमेदवारासाठी स्पर्धा रंगली आहे. तर प्रितीताई यांच्याकडे पक्षाचा झुकाव असल्याचे बोलले जाते त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोबतच भाजपमध्ये देखील उमेदवारीसाठी चांगलीच ओढातान होतांना दिसत आहे, भाजपच्या वतीने तुषार भारतीय गेल्या 10 वर्षापासून या मतदार संघात चांगल काम करीत आहेत. त्यामुळे यावेळीही त्यानंच तिकीट मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहेत….क्रमश…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: