राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधान केल्याने राज्यात तीव्र प्रतिसाद उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी राज्यपाल आणि प्रवक्ते सुधांशू यांच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. तर अमरावतीत चक्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेवर पान खाऊन थुंकून निषेध करण्यात आला आहे.
अमरावतीचे माजी महापौर अशोक डोंगरे यांनी पान खाऊन राज्यपाल कोशियारी यांच्या फोटोवर थुंकून निषेध नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने राज्यपाल कोशियारी विरोधात अमरावतीत राजकमल चौक येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी समर्थन केले आहे. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा मुद्दाही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.