आकोट – संजय आठवले
आकोट मतदार संघात निवडणूक चिन्ह वाटपाचा टप्पा पार पडला असून त्यात घोषित केल्याप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चिन्ह पंजा हे पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर भारतीय जनता पार्टीचे कमळ हे चिन्ह दुय्यम स्थानी आले आहे. चिन्ह वाटपापूर्वी ८ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने निवडणुकीचे रिंगणात ११ जण उभे ठाकले आहेत. त्यामध्ये मान्यता प्राप्त पक्षाचे ४ उमेदवार असून ७ लोक मान्यता नसलेल्या पक्षाचे आहेत.
आकोट मतदार संघात नामांकन अर्ज भरावयाचे अंतिम दिवसापर्यंत एकूण २२ लोकांनी अर्ज दाखल केले होते. छानणी वेळी त्यातील ३ अर्ज बाद झाल्याने १९ अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी मागे घेण्याचे अंतिम वेळेपर्यंत यातील ८ लोकांनी माघार घेतली. त्यामध्ये रामकृष्ण लक्ष्मण ढिगर, यशपाल यशवंत चांदेकर, गझंफरखां, मुजफ्फर खां, दिवाकर बळीराम गवई, देवेंद्र अशोकराव पायघन, सुभाष श्रीराम रोंदळे, डॉ. गजानन शेषराव महल्ले, सै. यावर अली सै. मुकदर अली ही नावे सामील आहे.
त्यामुळे निवडणुकीचे निर्णायक लढती करिता ११ योध्द्यांनी आपले शड्डू ठोकले आहेत. अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच निवडणुकीत कायम राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर महेश सुधाकरराव गणगणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निशाणी हात, असून प्रकाश गुणवंत भारसाकळे भारतीय जनता पार्टी निशाणी कमळ हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. तृतीय क्रमांकावर डॉक्टर सुजाता विद्यासागर वानखडे बहुजन समाज पार्टी निशाणी हत्ती. चतुर्थ क्रमांकावर कॅप्टन सुनील डोबाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना निशाणी रेल्वे इंजिन,
पाचव्या क्रमांकावर दीपक रामदास बोडखे वंचित बहुजन आघाडी निशाणी गॅस सिलेंडर, सहाव्या क्रमांकावर ललित सुधाकरराव बहाळे स्वतंत्र भारत पक्ष निशाणी किटली, सातव्या क्रमांकावर अन्सार उल्ला खान ताऊल्ला खान अपक्ष निशाणी गॅस शेगडी, आठव्या क्रमांकावर गोपाल जीवन राम देशमुख अपक्ष निशाणी रोड रोलर, नवव्या क्रमांकावर नितीन मनोहर वालसिंगे अपक्ष निशाणी एअर कंडिशनर, दहाव्या क्रमांकावर राम प्रभू गजानन तराळे अपक्ष निशाणी सफरचंद, अकराव्या क्रमांकावर लक्ष्मीकांत गजानन कौठकार अपक्ष निशाणी ऑटो रिक्षा हे आहेत.