अकोला – संतोष कुमार गवई
शहरात एकीकडे नवरात्रीची धूम सुरु असताना अकोल्यातील जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीत आज दुपारच्या सुमारास दोन समुदायांमध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे.
हमजा प्लॉट आणि चांदखा प्लॉट भागात ही घटना घडली असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नागरिकांनी अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.
अकोल्यातील जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या हमजा प्लॉट आणि चांदखा प्लॉट भागात आज दुपारी दोन समुदायांमध्ये संघर्ष उफाळला. या वादातून तुफान दगडफेक आणि जाळपोळ झाल्याचे समजते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाचा अखेर स्फोट झाला, आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली.
या संघर्षात जमावाने एक ऑटो पेटवून दिल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही बाजूंची दगडफेक सुरूच होती.
तर या राड्याचे मुख्य कारणही समोर आले आहे, मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑटोला धडक लागल्याने हा वाद पेटला असल्याचे बोलले जाते. त्यानंतर वाहनांना आग लावण्यात आल्या.
तसेच एका पत्रकाराची दुचाकी जाळण्यात आली. त्यानंतर दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जमाव तयार झाला आणि प्रचंड दगडफेक सुरु झाली या दगडफेक नियंत्रणात आणण्यासाठी अधिक पोलीस बलाची मदत घेऊन जमावाला शांत करण्यात आले.
पोलिसांनी ठिकठिकाणी पडलेल्या दगडांचा खच साफ करत घटनास्थळी शांतता प्रस्थापित केली. या संपूर्ण प्रकरणाचे मूळ एका ऑटोला धक्का लागल्यामुळे झालेल्या वादात असल्याचे बोलले जात आहे.
शहरात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली असली, तरी अकोला पोलीस दलाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी त्वरेने कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.