आकोट – संजय आठवले
आकोट शहरातील राहुल नगर येथून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस तिचे घरी परत आणल्यावरही तिला आपले घरी नेऊन तिचेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीस आकोट पोलिसांनी अटक करून अकोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
घटनेची हकीगत अशी कि, अकोट शहरातील राहुल नगर परिसरात राहणाऱ्या साडे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस राज रमेश मोरे वय वर्षे २० रा. जेतवन नगर आकोट याने मार्च २०२३ मध्ये पळवून नेले होते.
मुलीचे पालकांनी बरेच प्रयत्न केल्यावर राज मोरे ह्याने तिला तिचे घरी राहुल नगर येथे आणून सोडले. समाजात अप्रतिष्ठा होण्याचे भयाने मुलीच्या पालकांनी या प्रकरणाची पोलिसात कैफियत दिली नाही.
परंतु ह्या प्रकाराने आरोपीचे मनोबल उंचावले. त्यामुळे त्याने या मुलीशी आपले संबंध कायम ठेवले. आणि मार्च २०२३ ते आजतागायत त्या पीडित मुलीस जेतवन नगर येथील आपले घरी बोलावून तिचेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सातत्याने होत असलेल्या ह्या कृत्यामुळे सदर पीडितेची मासिक पाळी थांबली.
त्यावरून आकोट शहर पोलीस ठाणे येथे कैफियत दाखल करण्यात आली. पीडीतेच्या जबानी कैफियत वरून आकोट पोलिसांनी दि. २२.१०.२०२३ रोजी भादवी कलम ३६३,३५४,३५४(ड), ३७६(२), (एन) (आय) सहकलम ६, ८,१२ पोक्सो अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
त्यानंतर आकोट पोलिसांनी आरोपीस ताबडतोब अटक करून त्यास प्रभारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे अकोला यांचे समक्ष हजर केले.
त्यावेळी सदर गुन्ह्या संदर्भाने आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे, रक्त नमुने घेणे, गुन्ह्यातील ठिकाणांची पडताळणी करणे अद्याप बाकी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. या तपासकामी पोलिसांना आरोपीची आवश्यकता असल्याचे अजित देशमुख यांनी न्यायालयास पटवून दिले.
हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी आरोपी राज रमेश मोरे ह्यास दिनांक २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणाचा तपास आकोट पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस अधिकारी योगिता ठाकरे या करीत आहेत.