पातूरच्या अधिकाऱ्यांनी नाेंदवले लाभार्थ्यांचे जबाब…
पातूर – निशांत गवई
चाेंढी येथील रास्तभाव दुकानात ८८ अवैध धान्य साठा आढळून आल्यानंतर मंगळवारी संबंधित दुकानदारावर चान्नी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगलचंद सुवालाल जैन (रा. चाेंढी) असे आराेपीचे नाव आहे. साेमवारी यात दुकानाची पातूर तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रथमदर्शनी तपासणीतून हा प्रकार उजेडात आला हाेता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांचे जबाबही नाेंदवले. गरीबांसाठी असलेल्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या सर्वच रेशन माफियांच्या मुसक्या आळवण्याची मागणी यानिमित्ताने ग्रामस्थांकडून हाेत आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येते. विविध घटकांतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते. साेमवारी विभागीय आयुक्तांनी कार्यवाहीचा आदेश दिला हाेता. त्यामुळे पातूर तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी शितल माेरखडे यांनी चाेंढी येथील जैन यांच्या रास्तभाव धान्य दुकानाची तपासणी केली हाेती. अखेर याप्रकरणी माेरखडे यांनी चान्नी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आराेपीविराेधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमन १९५५चे कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड लाखांचा मुद्देमाल
पातूर येथील अधिकाऱ्यांनी चाेंढी येथील दुकानाची पाहणी केली. यात ६७ क्विंटल तांदुळ, ज्वारी-१५ क्विंटल ५० किलाे व ६ क्विंटल गहू असा अतिरिक्त धान्यसाठा अवैधरित्या आढळून आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. या मुद्देमालाची किंमत १५ लाख रुपये आहे.
लाभार्थ्यांनी केल्या तक्रारी
वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी चोंडी येथे लाभार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. लाभार्थ्यांनी धान्य मिळत नसल्याचे तक्रारी केल्या आहेत. अतिरिक्त असलेले धान्य अर्थात गहू ,तांदूळ, ज्वारी पंचनामा करून जप्त केले आहे. हे धान्य शासकीय गोडाऊन पातूर येथे जमा करण्यात आले आहे.- शितल मोरखडे -दांदळे, निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग, पातूर.
शासनाची फसवणूक
एफआयआरमध्ये काही महत्त्याच्या बाबी नाेंदण्यात अाल्या अाहेत. धान्यसाठा प्रथमदर्शनी अतिरिक्त स्वरुपात अाढळून आला. त्याअनुषंगाने संबंधित दुकानदाराचे बयान नाेंदवण्यात आले. त्यानुसार लाभार्थ्यांचे पाॅज मशीनवर अंगठे घेऊन धान्याचे वितरण दिल्याबाबत शासनाची फसवणूक केली आहे. लाभार्थ्यांकडून धान्य खरेदी करून काळा बाजार करीत असल्याचेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आता लक्ष अहवालाकडे
वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे येथे चोंढी येथील संबंधित रास्त धान्य दुकानाची पातूर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर आता लाभार्थ्यांचे जबाबही नाेंदवण्यात आले व गुन्हाही दाखल करण्यात आला. या संपूर्ण चाैकशी करुन अहवाल पातूर येथून जिल्हा मुख्यालयात सादर करण्यात येणार आहे. चाैकशीत आणखी बाबी आढळून आल्या, अहवालात निष्कर्ष काढण्यात येतील काय, हे अहवाल सादर झाल्यानंतरच पुढे येणार आहे.
चाेंढी येथील रास्तभाव दुकानात अतिरिक्त धान्य साठा आढळून आल्यानंतर पातूर येथील अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांचे जबाब नाेंदवले.