वनाधिका-यांची मिलीभगत; शासनाला लाखोंचा चुना
कुंपणानेच खाल्ले शेत
पातूर – निशांत गवई
आलेगाव वनपरिक्षेत्रात वनाधिकाऱ्यांच्या संगतमताने शेकडो सागवान वृक्षाची कत्तल झाली असून रस्त्याच्या नावाखाली हजारो ब्रास गौंणखणीज लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला असून सदर प्रकराची तक्रार स्थानिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पांढुर्णा ते सोनुना या रस्त्याचे काम करण्यात येत असून यामध्ये स्थानिक संबधीत अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदार अधिकारी यांना माहिती असून सुद्धा सर्वांनी पांढुर्ण- सोनुला रस्त्याचे कामकाजासाठी वनविभागाकडून देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त ,व्यतिरिक्त, खोदकाम वनविभागाच्या जमिनीवर शेकडो सागवान झाडांची कत्तल केली आहे.
वास्तविक वनविभागाकडून तीन मीटर रुंद रस्ता परवानगी मिळालेली असताना 26 ते 28 सागवान ची झाडे रस्त्यामध्ये येत होती परंतु अतिरिक्त आणि व्यतिरिक्त खोदकाम केल्यामुळे शेकडो सागवान झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. यामध्ये आलेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे तसेच पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.
अतिरिक्त खोदकाम केलेल्या ठिकाणी हजारो ब्रास अवैध मुरुमाचे उत्खनन झाल्याने शासनाची रॉयल्टी बुडविली आहे तसेच ते रस्त्यात वापरण्यात आलेले आहे हे सर्व खोदकाम करण्यासाठी दोन पोकलेन मशीन एक जेसीबी शेकडो ट्रॅक्टर वापरण्यात आलेली आहेत नियमानुसार सायंकाळी पाच नंतर खोदकाम करता येत नाही परंतु सदर ठेकेदाराने रात्रंदिवस 24 तास खोदकाम केल्याचे दिसून येते.
दोषी अधिकारी त्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संबंधित ठेकेदार पोकलंड मालक पोकलँड चालक जेसीबी चालक जेसीबी मालक ट्रॅक्टर मालक ट्रॅक्टर चालक या सर्वावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मंगेश प्रीतम इंगळे, सोनूण्याचे पोलीस पाटील रमेश नारायण कदम, निलेश सोनोने, पंजाबराव देवकते यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे वराती मागून घोडे
राजरोसपणे सागवान कत्तल आणि गौंनखणीज उतखनन झालेले असताना स्थानिकांच्या तक्रारी नन्तर आणि एका माहिती अधिकारी अर्जाच्या उत्तरानंतर आलेगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पोकलँड चालकावर कारवाई केल्याचा कांगावा केला असून त्याच्यावर भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडे असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत.
अतिरिक्त खोदकाम केल्या प्रकरणी भारतीय वन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे कार्यवाही सुरू आहे
विश्वनाथ चव्हाण
वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव