नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार,तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून काळी माती, मुरूम व वाळूचे रात्रंदिवस अवैध उत्खनन तसेच रॉयल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा जास्त व नियमबाह्य गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याने शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडत आहे.हे बुडत असलेले लाखोंचे महसूल वाचविण्यासाठी महसूल मंत्री काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुंभाराच्या नावाने रायल्टी घेऊन जिल्ह्यातील वीटभट्टी चालक हायवा टिप्परच्या साह्याने हजारो ब्रास माती उत्खनन करत आहेत याकडे मात्र अधिकाऱ्यांचे अर्थिक दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसत आहे.कारण ऑनलाइन दिले जाणाऱ्या चालनवर कोणत्याही प्रकारची वाहनांची माहिती, नंबर, वेळ, दिनांक, काहीही न टाकताच दररोज शेकडो ब्रास गौनखनिजाची विल्हेवाट लावली जात आहे.
गौनखनिजाचे अवैध उत्खनन करुन तस्करी करण्यास बंदी असल्याने वीटभट्टी चालकांनी नवीन शक्कल लढवली आहे. कुंभाराच्या नावाने रॉयल्टी भरुन मोठ्या हयवा टिप्परच्या साहाय्याने पोकलेन मशीनने काळी माती भरुन शेकडो टिप्पर नांदेड येथील वीटभट्टी चालक नेत आहेत याकडे महसूल विभागाचे अधिकारी मात्र साफ दुर्लक्ष करत आहेत.
तालुक्यातील अवैध माती उत्खनन ,अवैध मुरूम,वाळू तस्करी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बिनबोभाट सुरु आहे. या अवैध माती उत्खननाला कुणाचे वरदहस्त आहे. असा प्रश्न जाणकार नागरिक करीत आहेत.या अवैध उत्खननामुळे शासनाचे लाखोचे नुकसान होत असून महसूल मंत्री बावनकुळे हे शासनाचे बुडत असलेले महसूल वाचविण्यासाठी काय पाऊले उचलतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.