टाकरखेडा शंभू वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता निलंबीत…
अमरावती – वीज ग्राहकांच्या तक्रारांची सोडवणूक न करणे,मीटर उपलब्ध असुनही नविन वीज जोडण्या देण्यास टाळाटाळ करणे,तथा वीज ग्राहकांचे व महावितरण वरीष्ठ अधिकाऱ्यांचे फोन न उचलणे इत्यादी बाबिचा ठपका ठेवत अमरावती ग्रामिण विभागाअंतर्गत टाकरखेडा शंभू येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता निलेश भस्मे यांना कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर यांनी सेवेतून निलंबित केले.
महावितरणची सेवा अधिक ग्राहकाभिमूक करण्यासाठी प्रयत्न करणे ही वितरण केंद्र अभियंता म्हणून जबाबदारी असतांनाही निलेश भस्मे यांच्याबाबत ग्राहकांच्या तक्रारी होत्या. प्राप्त तक्रारीनंतर अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी आकस्मिकपणे भेट देऊन वितरण केंद्र कार्यालय टाकरखेडा शंभू यांची तपासणी केली असता कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयात १० मीटर उपलब्ध असुनही ८ ग्राहकांच्या वीज जोडण्या प्रलंबित असल्याचे,तसेच कृषीपंपाचे ०२ अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून आले.
वरीष्ठांच्या वीज पुरवठ्याशी व ग्राहकसेवेशी संबंधित दिलेल्या आदेशाचे स्वत: पालन न करणे, तसेच ते अधिनस्त कर्मचाऱ्यांनाही याची माहिती देत नसल्याचे स्पष्ट झाले. शाखा प्रमुख म्हणून काम करतांना निलेश भस्मे यांची ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे,नविन वीज जोडणीसाठी अंदाज पत्रक बनविणे,वेळेत नविन वीज जोडण्या देणे,
मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे कंत्राटदारांकडून कामे करून घेणे,वीज वाहिन्यांची व उपकरणांची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती करणे,थकबाकी वसुल करणे यासोबतच ग्राहकांच्या तक्रारांच्या नोदी ठेवत त्या वेळेत आणि तत्परतेने सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, इत्यादी जबाबदाऱ्या असतांना त्यांनी याबाबींकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.
वीज ग्राहक महावितरणचा केंद्रबिंदू ; महावितरण विजेसारख्या अत्यावश्यक सेवेत काम करत असल्याने ग्राहक हा महावितरणचा केंद्रबिंदू आहे.महावितरणची सेवा अधिक ग्राहकाभिमूक करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना तत्पर सेवा न देणे, ग्राहकांना वेठीस धरणे किंवा कामात निष्काळजीपणा करणाऱ्यावर यापुढेही कारवाई करण्यात येयील. अनिरूध्द आलेगावकर, कार्यकारी अभियंता, अमरावती,ग्रामीण विभाग