सांगली – ज्योती मोरे.
सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतलेली भूमिका ही खोडसाळपणाची आहे. प्रकल्प अहवालानुसार सांगली जिल्ह्याच्या वाटणीचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे.यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये.
अशी स्पष्ट भूमिका मांडत वेळ आल्यास जिल्ह्यातील जनतेच्या पाण्यासाठी खासदारकीही पणाला लावत राजीनामा देणार असल्याची भूमिका खासदार संजय पाटील यांनी सर्किट हाऊस मध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय.
कृष्णा नदी पाण्याविना कोरडी पडत चालल्याने नदीमध्ये कोयना धरणातून विसर्ग केला जावा अशी मागणी जिल्ह्यातील जनतेकडून होत असताना, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही दिवसांपूर्वी कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अहवाल तयार करून सदर अहवालावर सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
परंतु सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी मात्र स्वाक्षरी केली नव्हती .त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या पाण्यासाठी सांगली जिल्ह्याचे वातावरण तापू लागलं असल्यानं,मुख्यमंत्र्यांनी दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला मात्र आम्हाला भीक नको आमच्या वाटेचे पाणी हवे अशी खासदार संजय पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.